नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा संहिता २०१७च्या वादग्रस्त मसुद्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नेमलेल्या १३ सदस्यीय तज्ज्ञांच्या समितीमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंग, माजी फुटबॉलपटू बायच्युंग भूतिया आणि राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मुकुंदकम शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या समितीमध्ये जागतिक कांस्यपदक विजेती अंजू बॉबी जॉर्जचाही समावेश आहे. या समितीत भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) प्रतिनिधीचाही समावेश आहे. वय आणि कार्यकाळ याबाबत आक्षेप नोंदवत ‘आयओए’नेच ही संहिता फेटाळली होती.
राष्ट्रीय क्रीडा संघटनांच्या कारभारात पारदर्शकता आणि स्वायत्तता जपतानाचा समतोल साधण्याची जबाबदारी समितीवर असेल. राष्ट्रीय क्रीडा संघटनांचे प्रतिनिधित्व भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अजय सिंग, भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल, भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारिवाला आणि भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे बी. पी. बैश्य करणार आहेत. या समितीत भारतीय क्रीडा प्राधिकरणालाही स्थान देण्यात आले आहे.