एपी, लंडन
रूबेन लॉफ्टस-चीक आणि मेसन माऊंट यांनी उत्तरार्धात केलेल्या गोलच्या जोरावर चेल्सीने क्रिस्टल पॅलेसला २-० असे पराभूत करत ‘एफए चषक’ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
लंडनच्या वेम्बली स्टेडियवर झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. उत्तरार्धात ६५ व्या मिनिटाला लॉफ्टस-चीकने केलेल्या गोलमुळे १-० अशी आघाडी मिळाली. मग माऊंटने ७६ व्या मिनिटाला गोल करत चेल्सीला २-० अशा मजबूत स्थितीत पोहोचवले. त्यानंतर पॅलेसने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेल्सीचा भक्कम बचाव भेदण्यात त्यांना अपयश आले. गोलरक्षक मेंडीनेही चांगला खेळ केला.
आता १४ मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात चेल्सीची लिव्हरपूलशी गाठ पडणार आहे. लिव्हरपूलने शनिवारी मँचेस्टर सिटीवर ३-२ असा निसटता विजय मिळवला होता. आठ वेळचा ‘एफए चषक’ विजेता चेल्सीचा संघ अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल, तेव्हा त्यांना नवीन मालक मिळण्याची शक्यता आहे.
माद्रिदच्या विजयात बेन्झेमा चमकला
सेव्हिल : दुसऱ्या सत्राच्या भरपाई वेळेत आघाडीपटू करीम बेन्झेमाने केलेल्या गोलमुळे रेयाल माद्रिदने ला लिगा फुटबॉलच्या सामन्यात सेव्हियाला ३-२ असे पराभूत केले. त्यामुळे त्यांनी तीन हंगामात दुसऱ्यांदा स्पॅनिश लीगच्या जेतेपदाकडे कूच केली आहे. या सामन्यात इव्हान रॅकटिच (२१वे मिनिट) आणि एरिक लमेला (२५वे मि.) यांनी केलेल्या गोलमुळे सेव्हियाकडे २-० अशी आघाडी होती. मात्र, उत्तरार्धात रॉड्रिगो (५०वे मि.), नाचो (८२वे मि.) आणि बेन्झेमा यांनी गोल करत माद्रिदला ३-२ असा विजय मिळवून दिला. माद्रिदचे आता ३२ सामन्यांत ७५ गुण असून त्यांच्याकडे १५ गुणांची आघाडी आहे.