मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. इंग्लंडने या सामन्याची नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. दरम्यान भारतीय संघाने पहिल्या दिवशी ४ विकेट्स गमावत २६४ धावा केल्या आहेत. पण या सामन्यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचं नाव या स्टेडियममधील स्टँन्डला देण्यात आलं. यादरम्यान भारतीय माजी खेळाडूने आपलं दु:ख व्यक्त केलं.
मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममधील एका स्टँडला माजी भारतीय यष्टिरक्षक फारुख इंजिनिअर यांचे नाव देण्यात आले. २३ जुलै रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी त्यांना हा सन्मान देण्यात आला. फारुख इंजिनिअर हे दुसरे भारतीय क्रिकेटपटू आहेत ज्यांच्या नावावर विदेशी मैदानावर स्टँडचे नाव देण्यात आले आहे. भावूक होत त्यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्याच देशात असा सन्मान मिळाला नाही.
फारूक इंजिनीयर आणि क्लाईव्ह लॉयड यांच्या नावे या स्टेडियममधील स्टँन्डला नाव देण्यामागचं कारणही खास आहे. दोघेही अनेक वर्षे लँकेशायर क्रिकेट क्लबकडून क्रिकेट खेळले आहेत. ओल्ड ट्रॅफर्ड हे लँकेशायरचे होम ग्राउंड आहे. ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवरील बी स्टँन्ड जे खेळाडू आणि मीडिया सेंटर आणि हिल्टन हॉटेल यांच्यामध्ये आहे याचं नाव क्लाइव्ह लॉयड आणि इंजिनिअर स्टँड असे ठेवण्यात आले.
फारूक इंजिनीयर यांनी या स्टँडचं अनावरण झाल्यानंतर पीटीआयशी संवाद साधला आणि सांगितलं, “ही फक्त माझ्यासाठी नाही तर भारतासाठीही अभिमानाची गोष्ट आहे. मी क्लाईव्ह सकाळी याबाबत चर्चा करत होता. आमच्या सन्मानार्थ असं काही केलं जाईल याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. देवाचे खूप आभार. माझ्या देशात मला इतका सन्मान नाही मिळाला, त्याची ही भरपाई आहे”, असं फारूक इंजिनीयर म्हणाले.
फारूक इंजिनीयर पुढे म्हणाले, “मी सर्वाधिक क्रिकेट जिथे खेळलो तिथे माझ्या कामगिरीची दखल घेतली नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे.” ८७ वर्षीय फारूक इंजिनीयर यांनी त्यांच्या कारकिर्दीचा बहुतांश काळ मुंबईकडून खेळले आहेत. त्यांनी ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये अनेक वर्षे क्रिकेट खेळले आहेत. २०२४ मध्ये बीसीसीआयने फारूक इंजिनीयर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं.