कँडिडेट्ससह दोन्ही बुद्धिबळ स्पर्धाचे आयोजन पुढील वर्षी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओस्लो (नॉर्वे) : करोनाच्या साथीमुळे १ नोव्हेंबरपासून होणारी कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा पुढील वर्षांपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. जगज्जेतेपदाच्या लढतीसाठीचा प्रतिस्पर्धी ठरवणारी कँडिडेट्स स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्याने जगज्जेतेपदासाठी होणारी लढतही नोव्हेंबर २०२१पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

युरोपात करोना संसर्ग पुन्हा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. या स्थितीत १ नोव्हेंबरपासून रशियातील येकॅटरिनबर्ग येथे कँडिडेट्स स्पर्धेचे आयोजन अशक्य असल्याचे जागतिक बुद्धिबळ महासंघाचे (फिडे) म्हणणे आहे. मार्चमध्ये जगभरात टाळेबंदी करोनामुळे लागू असतानाही रशियात कँडिडेट्स स्पर्धेच्या सात फेऱ्या पार पडल्या. मात्र ती स्पर्धा सुरू असतानाच रशियाच्या सरकारने स्पर्धेतील खेळाडू त्यांच्या देशात टाळेबंदीमुळे परतू शकतील की नाही, याबाबत शंका व्यक्त केली होती. त्यामुळे कँडिडेट्स स्पर्धा थांबवण्यात आली. या स्पर्धेतील आणखी सात फेऱ्या बाकी आहेत. ‘फिडे’कडून ही स्पर्धा १ नोव्हेंबरपासून होणार असल्याचे सप्टेंबरमध्ये घोषित करण्यात आले होते. त्यामुळे पुढील वर्षी जगज्जेतेपदाची म्हणजेच मॅग्नस कार्लसनला आव्हान देणारी लढत मार्च-एप्रिलमध्येच होण्याची चिन्हे होती. मात्र कँडिडेट्स लांबल्याने जगज्जेतेपदाच्या लढतीचे वेळापत्रक बदलणेही ‘फिडे’ला भाग पडले.

कँडिडेट्स स्पर्धेत सहभागी फॅबिओ करुआना, वँग हाओ यासारख्या खेळाडूंनी रशियाला या स्पर्धेसाठी प्रवास करण्याबाबतही नाराजी दर्शवली होती. वँग हाओने तर यंदा स्पर्धा झाल्यास माघार घेण्याचेही संकेत दिले होते. कँडिडेट्स स्पर्धा मार्चमध्ये थांबली तेव्हा फ्रान्सचा मॅक्सिम वॅशियर-लॅग्रेव्ह आणि रशियाचा इयान नेपोमनियाश्ची यांचे समान साडेचार गुण झाले होते.

सध्या कँडिडेट्स स्पर्धा कधी होणार? या प्रश्नापेक्षा प्रत्येकाच्या आरोग्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे. अजूनही करोना संसर्गाच्या भयातून जग मुक्त झालेले नाही. पुढील हंगामात कँडिडेट्सचे आयोजन होणार असल्याचे म्हटले जाते. परंतु तेव्हादेखील करोनाचा संसर्ग किती प्रमाणात असेल, हे पाहावे लागेल.   

-फॅबिओ करुआना

चीनच्या बाहेर जायचे असल्यास फक्त ऑलिम्पिकच्या खेळाडूंना संधी मिळते. मात्र बिगरऑलिम्पिक प्रकाराच्या खेळाडूंना सरकारची अन्य देशात जाण्यास परवानगी नाही.

-वँग हाओ

एका वर्षांच्या अंतराने त्याच स्पर्धेतील बाकी लढती खेळणे, हे स्वीकारणे अवघड आहे.

-मॅक्सिम वॅशियर-लॅग्रेव्ह

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fide candidates tournament postponed till next year due to coronavirus zws
First published on: 18-10-2020 at 02:51 IST