नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) नैतिकता आणि शिस्तपालन आयोगाला अमेरिकेचा ग्रँडमास्टर हान्स निमनविरुद्ध सामन्यांदरम्यान फसवणुकीचे (चीटिंग) कोणतेही पुरावे सापडले नाहीत.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील सिंकेफील्ड स्पर्धेत निमनने पाच वेळच्या विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिला होता. त्यानंतर कार्लसनने या स्पर्धेतून अचानक माघार घेतली होती. त्याचा युवा प्रतिस्पर्धी निमनने फसवणूक केली असावी आणि त्याला वैतागूनच कार्लसनने माघार घेतली, असा तर्क त्या वेळी लावण्यात आला होता. त्यापूर्वीच्या काही ऑनलाइन स्पर्धामध्ये निमनने गैरप्रकारांचा अवलंब केल्याचे आढळून आले होते आणि त्याला ताकीदही देण्यात आली होती. त्यानंतर निमनने आपल्याविरुद्धही गैरप्रकार केल्याचा कार्लसनचा दावा होता. त्याच्या आरोपांनंतर निमनने कार्लसन, त्याची कंपनी मॅग्नस समूह आणि इतरांविरुद्ध १० कोटी अमेरिकन डॉलरच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती.

हेही वाचा >>> IND vs SA 3rd T20 : सूर्या-कुलदीपच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा १०६ धावांनी केला पराभव, मालिका सोडवली बरोबरीत

‘फिडे’च्या समितीने गेल्या तीन वर्षांतील १३ सदेह (ओव्हर द बोर्ड) स्पर्धामधील निमनच्या कामगिरीचा सांख्यिकीय आढावा घेतला. यात सिंकेफील्ड स्पर्धेचाही समावेश होता. मात्र, निमनने फसवणूक केल्याचे त्यांना आढळले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘आम्ही ज्या सामन्यांचा सांख्यिकीय आढावा घेतला, त्यात ग्रँडमास्टर निमनने काहीही गैर केल्याचे आढळले नाही. तसेच सिंकेफील्ड स्पर्धेतील त्याच्या कामगिरीचा आढावा घेतला असता त्याने फसवणूक केल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. निमनची गेल्या काही वर्षांतील कामगिरी ही त्याच्या अपेक्षित खेळाच्या पातळीशी सुसंगत आहे,’’ असे अहवालात नमूद करण्यात आले होते.   दरम्यान, निमनवर फसवणुकीचे आरोप करणाऱ्या कार्लसनला दंड ठोठावण्यात आला आहे. चारपैकी तीन आरोपांमध्ये कार्लसन दोषी आढळला नाही, असे ‘फिडे’ने स्पष्ट केले. मात्र, ठोस कारणाशिवाय स्पर्धेतून माघार घेतल्याने त्याला १० हजार युरोचा दंड ठोठावण्यात आला.