विश्वचषकाच्या तिकिटांची बेकायदेशीर विक्री करणारी टोळी पोलिसांनी गजाआड केल्यानंतर या प्रकरणात ब्राझील, अर्जेटिना आणि स्पॅनिश फुटबॉल संघटनांचे पदाधिकारी गुंतले आहेत का, याचा तपास ब्राझीलचे प्रशासन करीत आहे.
ब्राझीलचा माजी फुटबॉलपटू रोनाल्डिन्होचा भाऊ आणि त्याचा एजंट रोबटरे डी एसिस मोरेरा यांची या प्रकरणी चौकशी करण्यात आली असल्याची माहिती तपासप्रमुख मार्कोस काक यांनी दिली. विश्वचषकाची तिकिटो बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या ११ जणांना बुधवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही तिकिटे ‘फिफा’शी संबंधित असलेल्या व्यक्तीकडून मिळवली असावीत, असा संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे. पुरस्कर्ते, फुटबॉल संघटना, खेळाडू आणि बिगरशासकीय संस्था यांच्यासाठीची ही तिकिटे या टोळीकडे सापडली आहेत.
‘‘रोनाल्डिन्होच्या भावाने आपल्या काही मित्रांना ही तिकिटे खरेदी करण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. परंतु या बेकायदेशीर तिकिटांच्या व्यवहारात त्याचा सहभाग आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. प्राथमिक चौकशीत तरी त्याचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे,’’ असे काक यांनी सांगितले.
मोहम्मदू लॅमिने फोफाना हा अल्जेरियाचा नागरिक या तिकीट विक्री करणाऱ्या टोळीचा म्होरक्या आहे. गेली तीन महिने पोलीस त्याच्या व्यवहारांवर पाळत ठेवून होती. प्रत्येक सामन्याच्या एक हजार युरो मूळ किमतीची एक हजार तिकिटे ही टोळी विकायची. रिओमधून अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींमध्ये फोफानाचा समावेश होता, तर साओ पावलो
येथून दोघांना अटक करण्यात आली आहे.