कनिष्ठ पुरुष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक डी मॅटोस यांचे मत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पध्रेतील सहभागी संघांच्या तोडीचा खेळ करण्याची धमक भारतीय खेळाडूंमध्ये आहे, असे मत भारतीय संघाचे प्रशिक्षक लुईस नॉर्टन डी मॅटोस यांनी व्यक्त केले.

६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या स्पध्रेत यजमान भारतासमोर अमेरिका, कोलंबिया आणि घाना यांचे आव्हान असणार आहे.

‘‘फुटबॉलमध्ये सर्व लढती जिंकण्यासारख्याच असतात. विजयाची पाच टक्के संधी असली तरी आम्ही स्वत:ला झोकून देऊ. जगातील इतर संघांप्रमाणे भारतीय संघही तुल्यबळ आहे, हे आम्हाला दाखवायचे आहे. हे सिद्ध करण्यात आम्ही यशस्वी झालो तर ती आमच्यासाठी चांगली गोष्ट असेल,’’ असे डी मॅटोस म्हणाले.

विश्वचषक स्पध्रेच्या तयारीसाठी भारतीय संघ गोव्यात सराव करत आहे. या संघाने नुकताच मेक्सिको दौऱ्यात चार देशांच्या स्पध्रेत सहभाग घेतला आणि त्यात त्यांनी बेनफिका, सर्बिया आणि मॅसेडोनिया यांच्याविरुद्ध खेळ केला. डी मॅटोस म्हणाले, ‘‘भारतीय खेळाडूंचा स्तर उंचावला आहे, परंतु विश्वचषक स्पर्धा प्रचंड आव्हानात्मक असते. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांच्या तोडीस तोड खेळ आम्हाला करता आला तरी तो आमच्यासाठी विजयासारखाच असेल. प्रत्येक सामना तुम्ही जिंकण्यासाठी किंवा नवीन काही शिकण्यासाठी खेळतो. चिली आणि मॅसेडोनियाविरुद्ध आमचा खेळ तुल्यबळ झाला. मात्र विश्वचषक स्पर्धा आणि मैत्रिपूर्ण सामना यात फरक आहे.’’

‘‘भारतातील या फुटबॉल क्रांतीत सहभागी असल्याचा आनंद निराळाच आहे. भारतीय खेळाडूंनी याच मेहनतीने आणि निष्ठेने खेळ केल्यास येणाऱ्या काळात त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या निकालांची नोंद होऊ शकते. पहिल्याच फुटबॉल विश्वचषकात भारतीय संघात निवड झाल्यामुळे हे खेळाडू देशासाठी नायक ठरले आहेत. ही पिढी येणाऱ्या अनेक पिढींसाठी प्रेरणादायी ठरेल,’’ असे ते म्हणाले.

कर्णधारपदी अमरजीतची एकमुखाने निवड

पुढील महिन्यात होणाऱ्या फि फा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पध्रेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मध्यरक्षक अमरजीत सिंग कियामकडे सोपवण्याचा निर्णय खेळाडूंनी एकमताने घेतला. कर्णधारपदसाठी प्रशिक्षक लुईस नॉर्टन डी मॅटोस यांनी चार खेळाडूंची नावे सुचवली होती आणि २७ खेळाडूंच्या चमूला या चारपैकी त्यांच्या पसंतीच्या कर्णधाराचे नाव एका कागदावर लिहिण्यास सांगितले. त्यात खेळाडूंनी अमरजीतची निवड केली.  जितेंद्र सिंग याला दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली आणि त्याच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले. दरम्यान, गतवर्षी एएफसी १६ वर्षांखालील अजिंक्यपद स्पध्रेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या सुरेश सिंगला तिसऱ्या, तर बचावपटू संजीव स्टॅलिनला चौथ्या क्रमांकावर पसंती मिळाली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa u 17 world cup junior indian football team luis norton de matos
First published on: 20-09-2017 at 02:24 IST