लिओनेल मेस्सीचा गोलधमाका आणि अहमद मुसाने दिलेले चोख प्रत्युत्तर यामुळे अर्जेटिना आणि नायजेरिया यांच्यातील सामना रंगतदार ठरला. अखेर मार्कस रोजोच्या निर्णायक गोलमुळे अर्जेटिनाने नायजेरियावर ३-२ असा विजय मिळवून साखळी फेरीतील विजयांची हॅट्ट्रिक साजरी केली. सलग तिन्ही सामने जिंकून अर्जेटिनाने ‘फ’ गटात नऊ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. मात्र बोस्निया आणि हेझ्रेगोव्हिनाने इराणला ३-१ असे हरवल्यामुळे नायजेरियाने पराभूत होऊनही बाद फेरीतील स्थान निश्चित केले.
तिसऱ्या मिनिटालाच मेस्सीने अर्जेटिनाचे खाते खोलले. अँजेल डी मारियाने मारलेला फटका नायजेरियाचा गोलरक्षक विन्सेंट एनयेमाला स्पर्श करून गोलबारला आदळून बाहेर आला. समोरून धावत येणाऱ्या मेस्सीने डाव्या पायाने जोरदार फटका लगावत पहिला गोल केला. एका मिनिटानंतरच अहमद मुसाने गोल करून सामन्यात बरोबरी साधली. ४४व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री-किकवर मेस्सीने मारलेला फटका एनयेमाला काही कळण्याच्या आत गोलजाळ्यात गेला. मात्र दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच मुसाने दुसरा गोल करून पुन्हा नायजेरियाला बरोबरी साधून दिली. ५०व्या मिनिटाला मेस्सीने कॉर्नरवरून दिलेल्या पासवर चेंडू मार्कस रोजोच्या गुडघ्यावर पडून थेट गोलजाळ्यात विसावला. याच निर्णायक गोलाच्या बळावर अर्जेटिनाने ३-२ असा विजय साकारला.