फिफा विश्वचषकातील ड गट म्हणजे ‘ग्रूप ऑफ डेथ’पैकीच एक. गटातून बाद फेरी गाठण्यासाठी इटली, इंग्लंड आणि उरुग्वे यांच्यातच खरी चुरस. कोस्टा रिकाचे नाव ना शर्यतीत, ना त्यांना बाद फेरीसाठी कुणी पसंती दर्शवलेली. पण पहिल्याच सामन्यात कोस्टा रिकाने उरुग्वेला पराभवाची धूळ चारली आणि गटातील समीकरणेच बदलून गेली. दुसऱ्या सामन्यात बलाढय़ इटलीला पराभूत करून कोस्टा रिकाने ड गटातून बाद फेरी गाठत संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला. कोणतीही संधी नसतानाही कोस्टा रिकाने अंतिम १६ जणांमध्ये धडक मारली, ही त्यांची ऐतिहासिक कामगिरी. आता ग्रीसविरुद्धच्या सामन्यातही कोस्टा रिका विजयासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.
गटातील तिन्ही संघ विश्वविजेते असल्यामुळे कोस्टा रिकाला जगासमोर सिद्ध करण्यासारखे काहीच नव्हते. प्रतिष्ठा पणाला लागलेली नसताना लोकसंख्येच्या बाबतीत जगात १२४व्या क्रमांकावर असलेल्या कोस्टा रिकाने अभूतपूर्व अशी कामगिरी करून दाखवली. आशिया खंडातील इराण, दक्षिण कोरिया, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे चारही संघ एकही सामना न जिंकता पहिल्याच फेरीत गारद झाल्यानंतर दक्षिण अमेरिकेतील कोस्टा रिकाने मात्र संपूर्ण जगाची मने जिंकली. कोस्टा रिका संघातील फक्त तीनच खेळाडू आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये नावाजलेले बाकीचे युरोपमधील दुय्यम दर्जाच्या स्पर्धात प्रतिनिधित्व करणारे. पण प्रशिक्षक जॉर्ज लुइस पिंटो यांनी उत्तम संघबांधणी करत बचाव, आक्रमण अशा आघाडय़ांवर चमकदार कामगिरी करून कर्णधार ब्रायन लुइझवर ‘प्लेमेकर’ची जबाबदारी सोपवली. इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये फुलहॅमतर्फे खेळताना अपयशी ठरलेल्या रुइझने मात्र अप्रतिम कौशल्याची चुणूक दाखवली. दर चार वर्षांनी येणाऱ्या या कुंभमेळ्यात छोटय़ा राष्ट्रातील खेळाडूंसाठी चमक दाखवण्याच्या संधीचे त्याने सोने केले.
पिंटो हे चेल्सीचे प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांचे चाहते. सराव आणि कार्यप्रणालीवर भर देणाऱ्या पिंटो यांनी वर्षांनुवर्षे आपल्या भक्कम बचावतंत्राच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिले आहेत. काहीतरी करण्याची तळमळ, शिस्तबद्ध खेळ आणि जिद्द हे त्यांचे तत्त्वज्ञान. साखळी फेरीत एकही मैदानी गोल न स्वीकारणाऱ्या (उरुग्वेच्या एडिन्सन कावानीचा पेनल्टीवर गोल) कोस्टा रिकाने आपला बचाव किती मजबूत आहे, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. गटात दोन धक्कादायक निकाल दिल्यानंतर रॉय हॉजसन यांच्या प्रशिक्षकपदाखालील इंग्लिश संघ कोस्टा रिकाला चारी मुंडय़ा चीत करेल, असे वाटले होते. पण आपल्या देशासाठी काहीतरी विशेष करून दाखवण्याची वृत्ती कोस्टा रिकाने दाखवली, ज्या वृत्तीचा इंग्लिश खेळाडूंमध्ये अभाव जाणवत होता.
२००२ आणि २००६च्या विश्वचषकात कोस्टा रिकाला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. त्यावेळी त्यांचे फक्त तीन खेळाडू परदेशातील क्लबमधून खेळत होते. आता ती संख्या १४ वर गेली आहे. त्यापैकी ११ जण युरोपमधील छोटय़ा क्लबकडून खेळतात. मात्र त्यापैकी एकही जण फॉर्मात नव्हता. अशा स्थितीत कोस्टा रिकाला मुख्य फेरीसाठी पात्र ठरवण्याचे खडतर आव्हान पिंटो यांच्यासमोर होते. मात्र कोनसाफ गटातून अमेरिकेपाठोपाठ दुसरे स्थान पटकावून कोस्टा रिकाने मुख्य फेरी गाठली. वेग, उर्जा, भक्कम बचाव आणि प्रतिहल्ले चढवण्यात पटाईत असलेल्या कोस्टा रिकाने लवचिकतेचे धोरण स्वीकारत उरुग्वेसारख्या संघाचे पानीपत केले. तांत्रिकदृष्टय़ा सक्षम असलेला हा संघ १९९०नंतर प्रथमच बाद फेरीत पोहोचला आहे. पण त्यावरच समाधान न मानता ‘सरप्राइज पॅकेज’ ठरलेला कोस्टा रिका कितपत मजल मारतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.