अल वाकराह : बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या आघाडीपटू विन्सेंट अबुबाकरने केलेल्या दिमाखदार कामगिरीच्या बळावर कॅमेरूनने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत पिछाडीवरून मुसंडी मारत सर्बियाविरुद्ध ३-३ अशी बरोबरी साधली.

अबुबाकरने सामन्याच्या ६४व्या मिनिटाला सर्बियाचा गोलरक्षक वांजा मिलिनकोव्हिचला चकवत गोल केला आणि नंतर तीन मिनिटांनी आघाडीपटू चुपो मोटिंगला गोल करण्यासाठी साहाय्य केले.  

कॅमेरूनसाठी सामन्याची सुरुवात चांगली झाली. त्यांच्या जीन चार्ल्स कॅस्टेलेटोने २९व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत कॅमेरून आपली आघाडी कायम राखले असे दिसत असतानाच सर्बियाच्या स्ट्रेहिंजा पाव्हलोव्हिचने पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत गोल करत सामना बरोबरीत आणला. यानंतर सर्गेज मिलिनकोव्हिचने दोन मिनिटांनंतर गोल करत सर्बियाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रातही सर्बियाने आपली हीच लय कायम राखली. त्यांचा आघाडीपटू आलेक्सांद्र मित्रोव्हिचने ५३व्या मिनिटाला गोल करत संघाला ३-१ अशी मजबूत आघाडी मिळवून दिली.