नवी दिल्ली : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत संयुक्तपणे होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील खेळपट्टया फिरकीला अनुकूल असणे अपेक्षित आहे. याचाच विचार विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात चार फिरकीपटूंची निवड करण्यात आली आहे. या संघात केवळ तीन वेगवान गोलंदाज आहेत. मात्र, भारताला स्पर्धेदरम्यान आणखी एका वेगवान गोलंदाजाची कमतरता जाणवू शकेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंच आणि वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज इयन बिशप यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग या वेगवान गोलंदाजांना भारतीय संघात स्थान दिले आहे. ‘आयपीएल’मध्ये विशेषत: अखेरच्या षटकांत चांगली गोलंदाजी करत असलेल्या संदीप शर्मा, टी. नटराजन आणि आवेश खान यांना १५ सदस्यीय संघात स्थान देणे निवड समितीने टाळले. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये बुमरा पूर्ण लयीत आहे. सिराज आणि अर्शदीप यांना मात्र आपली सर्वोत्तम कामगिरी करता आलेली नाही. यंदाच्या स्पर्धेत सिराजने षटकामागे ९.५०च्या, तर अर्शदीपने ९.६३च्या धावगतीने धावा दिल्या आहेत. मात्र, या दोघांमध्ये नवा चेंडू िस्वग करण्याची क्षमता आहे आणि याचाच विचार करून ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी त्यांची भारतीय संघात निवड झाल्याची शक्यता आहे. परंतु या तिघांसह भारताने आणखी एक वेगवान गोलंदाज निवडला पाहिजे होता, असे फिंचला वाटते.

‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात चार फिरकीपटू पाहून मला आश्चर्य वाटले. मी यापूर्वी संभाव्य संघ निवडला होता, तेव्हा केवळ दोन फिरकीपटूंचा त्यात समावेश केला होता. मी एका अतिरिक्त वेगवान गोलंदाजाची निवड केली होती. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये बुमरा वगळता भारताच्या कोणत्याही वेगवान गोलंदाजाने सातत्यपूर्ण कामगिरी केलेली नाही. विशेषत: ‘पॉवर-प्ले’मध्ये भारतीय गोलंदाज अपयशी ठरत आहेत. याच कारणास्तव भारताने आणखी एका वेगवान गोलंदाजाला संघात स्थान दिले पाहिजे होते असे मला वाटते,’’ असे फिंच म्हणाला.

हेही वाचा >>> IPL 2024 : विजयी पुनरागमनाचा हैदराबादचा प्रयत्न; लयीत असलेल्या राजस्थान रॉयल्सचे आज आव्हान; हेड, अभिषेककडून अपेक्षा

‘‘आता भारताला सामन्यात तीन फिरकीपटूंसह खेळायचे असल्यास यापैकी एकाला तरी ‘पॉवर-प्ले’मध्ये गोलंदाजी करावी लागू शकेल. मात्र, विश्वचषकासाठी निवड झालेला भारताचा कोणताही फिरकीपटू ‘आयपीएल’मध्ये सातत्याने ‘पॉवर-प्ले’मध्ये गोलंदाजी करताना दिसत नाही. त्यामुळे एक अतिरिक्त वेगवान गोलंदाजाची निवड न करण्याचा भारताला फटका बसू शकेल,’’ असेही फिंचने नमूद केले.

इशन बिशपही फिंचशी सहमत होते. ‘‘या स्पर्धेत फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असेल असा अंदाज आहे. मात्र, निश्चितपणे आपण काहीही सांगू शकत नाही. विश्वचषकातील खेळपट्टया या द्विदेशीय मालिका किंवा स्थानिक क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या खेळपट्टयांपेक्षा वेगळया असू शकतील. तसे झाले तर भारतीय संघ अडचणीत सापडू शकेल. त्यामुळे १५ सदस्यीय संघात चार फिरकीपटू निवडण्याची खरेच गरज होती असे मला वाटत नाही,’’ असे बिशप म्हणाले. २ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी चायनामन कुलदीप यादव, लेग-स्पिनर यजुवेंद्र चहल, तसेच डावखुरे रवींद्र जडेजा व अक्षर पटेल या चार फिरकीपटूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

तीन वेगवान गोलंदाज पुरेसे -प्रसाद

भारताच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी मात्र फिंच आणि बिशप यांच्यापेक्षा वेगळे मत व्यक्त केले. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी तीन वेगवान गोलंदाजांची निवड करण्याचा निर्णय योग्यच आहे, असे प्रसाद यांना वाटते. ‘‘अमेरिका आणि वेस्ट इंडिजमधील खेळपट्टयांकडून फिरकीपटूंना साहाय्य मिळेल. त्यामुळेच भारतीय संघात चार फिरकीपटूंना स्थान देण्यात आले आहे. अंतिम ११ खेळाडूंत केवळ दोन प्रमुख वेगवान गोलंदाज असतील आणि त्यांच्या बरोबरीने हार्दिक पंडया असेल. अशात १५ सदस्यीय संघात तीन वेगवान गोलंदाज पुरेसे आहेत,’’ असे प्रसाद म्हणाले. तसेच सुरुवातीच्या सामन्यांत बुमरा आणि सिराज हे पहिल्या पसंतीचे वेगवान गोलंदाज असायला हवेत, असेही प्रसाद यांनी सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finch bishop reviews indian squad for the icc t20 world cup zws