पाकिस्तानविरुद्ध पराभूत व्हावे लागल्याने भारताला आता आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी सांख्यिकीय आकडेमोडीवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्यात भारताने बोनस गुण मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी चमत्काराची अपेक्षा आहे. अफगाणिस्तानविरुद्ध बोनस गुणाची कमाई केली तरी भारताला पाकिस्तानच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे. भारत आणि पाकिस्तानचे समान गुण झाल्यास, सरस धाव सरासरीच्या आधारावर कोणता संघ अंतिम फेरीत मजल मारेल, हे ठरेल. ‘‘आता अखेरच्या सामन्यावर आमचे लक्ष लागले आहे. चांगली कामगिरी करून बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. या सामन्यानंतरच भारताचे या स्पर्धेतील भवितव्य काय असेल, हे समजेल. चुका टाळून कामगिरी सुधारण्याचा आमचा प्रयत्न असेल,’’ असे कोहलीने सांगितले.