भारतातील बहुतेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सकडे अफाट संपत्ती आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि गरीब, हे ऐकून थोडे विचित्र वाटेल. परंतु आपल्या शेजारील देश पाकिस्तानमधील परिस्थिती अगदी उलट आहे. २००६मध्ये टीम इंडियाविरूद्ध शानदार गोलंदाजीद्वारे आपला वेगळा ठसा पाकिस्तानचा माजी ऑफस्पिनर अरशद खान आता दारिद्र्यात जगत आहे.

१९९७-९८मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध पदार्पण करणारा ऑफ स्पिनर अरशद खान आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सिडनी येथे उबर कॅब चालवतो. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला त्याच्या कुटुंबासाठी इतका संघर्ष करावा लागतो, हे नक्कीच त्रासदायक आहे.

हेही वाचा – कभी आगे तू कभी पीछे मै..! स्कॉटलंडहून मागवलेल्या घोड्यासह ३९ वर्षीय धोनीनं लावली शर्यत

अरशद खानने त्याच्या पहिल्याच सामन्यात भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरची विकेट घेतली होती. इतकेच नव्हे, तर स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागही त्याच्या चेंडूंसमोर संघर्ष करत होता. इंडियन सुपर लीगमध्ये अरशद खान हैदराबाद संघाकडून खेळला आहे. निवृत्तीनंतर हा खेळाडू आर्थिक पेचात सापडला.

अरशद खानची कारकीर्द

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत अरशद खानने ९ कसोटी सामन्यांमध्ये ३२ बळी घेतले. त्याचबरोबर त्याने पाकिस्तान संघाबरोबर ६० एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत, ज्यात त्याच्या खात्यात ५७ बळी आहेत. अर्शद खानच्या नावावर ६०१ प्रथम श्रेणी बळी आणि १८९ लिस्ट ए बळी आहेत. त्याच्या एकंदरीत कामगिरीकडे पाहता, तो किती चांगला गोलंदाज होता हे सिद्ध होते.