कोटला स्टेडियमवरून माहिती पुरवणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अटक

नुकत्याच स्थगित करण्यात आलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये नवी दिल्लीच्या फिरोझशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या एका सामन्यात सट्टेबाजीसाठी साहाय्य करणाऱ्या एका व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

एका सामन्यात स्टेडियमवरील प्रेक्षागृहातून चेंडूगणिक माहिती सट्टेबाजांना पुरवल्याप्रकरणी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सट्टेबाजांकडून या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती, असा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख शब्बीर हुसैन शेखादम खांडवावाला यांनी केला आहे.

प्रत्यक्ष सामना आणि टीव्हीवरील थेट प्रक्षेपण यातील वेळफरकाचा लाभ घेऊन दिल्लीतील एका ‘आयपीएल’ सामन्यात सीमारेषेबाहेरून चेंडूगणिक सट्टेबाजीला साहाय्य केल्याचे सिद्ध झाले आहे, असे खांडवावाला यांनी म्हटले आहे.

दिल्ली पोलिसांनी कोटला येथून आणखी दोघांना पकडले असून, त्यांनी २ मे रोजी झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि सनराजयर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याप्रसंगी बोगस प्रवेशपत्र बाळगले होते. यातील एका व्यक्तीकडे दोन मोबाइल आढळल्याने अधिकाऱ्याला संशय आला. करोनाच्या कालखंडात सामने जैव-सुरक्षित वातावरणात होत असल्याने सट्टेबाजांकडून चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना हाताशी घेतले जात आहेत, असे खांडवावाला म्हणाले.

लाचलुपत प्रतिबंधक अधिकाऱ्याने सट्टेबाजीस माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीला तू येथे काय करीत आहेस, असे विचारले. तेव्हा त्याने प्रेयसीशी गप्पा मारत असल्याचे त्याने सांगितले. मग अधिकाऱ्याने त्याला पुन्हा फोन लावून मोबाइल देण्यास सांगितले. त्यामुळे त्या व्यक्तीने पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला पकडण्यात आले.

ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटू मालदीवला दाखल
सिडनी : ‘आयपीएल’मध्ये खेळणारे ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटू ‘बीसीसीआय’च्या प्रयत्नांमुळे विशेष विमानाने मालदीवला पोहोचले आहेत, अशी माहिती ‘क्रिकेट ऑस्टे्रलिया’चे प्रभारी मुख्य कार्यकारी निक हॉकले यांनी बुधवारी दिली. खेळाडू, मार्गदर्शक आणि समालोचक अशा ३८ जणांचा चमू मालदीव येथे ऑस्ट्रेलियाकडे जाणाऱ्या पहिल्या विमानाच्या प्रतीक्षेत आहे. भारतामधील करोना साथीमुळे ऑस्ट्रेलियातील सरकारकडून हवाई वाहतूक प्रवासास बंदी घातली आहे. चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाजीचे प्रशिक्षक माइक हसी यांना करोनाची लागण झाली असून, त्यांना भारतामध्ये १० दिवसांचे विलगीकरण पूर्ण केल्यानंतरच मायदेशी पाठवण्यात येईल.

इंग्लंडचे आठ क्रिकेटपटू मायदेशी रवाना
लंडन : ‘आयपीएल’मध्ये सहभागी असलेल्या इंग्लंडच्या ११ क्रिकेटपटूंपैकी जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो यांच्यासह आठ जण मायदेशी रवाना झाले आहेत. सॅम करन, टॉम करन, सॅम बिलिंग्ज, ख्रिस वोक्स, मोईन अली आणि जेसन रॉय इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत. ईऑन मॉर्गन, डेव्हिड मलान आणि ख्रिस जॉर्डन हे तिघे जण येत्या ४८ तासांत पोहोचतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढल्यामुळे भारताला ब्रिटनने लाल यादीत टाकले आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये पोहोचलेल्या क्रिकेटपटूंना १० दिवसांचे विलगीकरण बंधनकारक असेल.

* आगामी मालिकेच्या उद्देशाने न्यूझीलंडचे खेळाडू १० मेनंतर हवाई प्रवासावरील बंदी उठल्यानंतर इंग्लंडला रवाना होतील, असे न्यूझीलंड क्रिकेटपटूंच्या संघटनेचे प्रमुख हीथ मिल्स यांनी सांगितले.
* ‘आयपीएल’मध्ये खेळणाऱ्या परदेशी क्रिकेटपटूंपैकी दक्षिण आफ्रिका (११), न्यूझीलंड (१०), वेस्ट इंडिज (९), अफगाणिस्तान (३) आणि बांगलादेश (२) यांच्या परतीच्या प्रवासाची योजना ‘बीसीसीआय’कडून आखली जात आहे.