पॅरिस : तारांकित युवा आक्रमणपटू किलियान एम्बापेने साकारलेल्या गोल चौकारामुळे गतविजेत्या फ्रान्सने शनिवारी मध्यरात्री फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीतील स्थान निश्चित केले. याव्यतिरिक्त बेल्जियमने रोमेलू लुकाकूच्या अनुपस्थितीतही विश्वचषकाची पात्रता मिळवली.

युरोप खंडातील संघांमध्ये सुरू असलेल्या पात्रता फेरीतील लढतीत फ्रान्सने कझाकस्तानचा ८-० असा धुव्वा उडवला. सात सामन्यांतील चार विजय आणि तीन बरोबरींसह १५ गुण नावावर असलेल्या फ्रान्सने ड-गटात अग्रस्थान मिळवले आहे. एम्बापेने अनुक्रमे ६व्या, १२व्या, ३२व्या आणि ८७व्या मिनिटाला गोल केले. त्याला अनुभवी करिम बेन्झेमाने (५५ आणि ५९ मि.) उत्तम साथ दिली. पुढील वर्षी कतार येथे फुटबॉल विश्वचषक रंगणार आहे.

अन्य लढतीत बेल्जियमने इस्टोनियावर ३-१ अशी मात केली. इ-गटात सात सामन्यांतील सहा विजय आणि एका बरोबरीचे १९ गुण मिळवून बेल्जियमने अग्रस्थान पटकावले. नेदरलँड्सला मात्र माँटेनेग्रोने २-२ असे बरोबरीत रोखले. यजमान कतारव्यतिरिक्त फ्रान्स, बेल्जियम, डेन्मार्क, जर्मनी या संघांनी मुख्य फेरीतील स्थान पक्के केले आहे.

पोर्तुगालची सर्बियाशी गाठ

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालला विश्वचषकाची पात्रता मिळवण्यासाठी सर्बियाचा अडथळा ओलांडावा लागणार आहे. अ-गटात दोन्ही संघांच्या खात्यात सात सामन्यांत १७ गुण आहेत. तूर्तास सरस गोलफरकामुळे पोर्तुगाल अग्रस्थानी आहे. प्रत्येक गटातील फक्त विजेताच थेट मुख्य फेरीसाठी पात्र होणार असून दुसऱ्या स्थानावरील संघाला आणखी एक पात्रता फेरी खेळावी लागणार आहे.