आजपासून फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचा थरार रंगणार

रोलँड गॅरोसवरील क्लेकोर्ट्स दरवर्षी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत अनपेक्षित निकाल नोंदविण्याबाबत ख्यातनाम आहेत. यंदा अनुभवी व मानांकनात वरिष्ठ असलेल्या खेळाडूंना पराभवाचा धक्का देण्यासाठी युवा खेळाडू उत्सुक झाले आहेत. या स्पर्धेस रविवारपासून येथे प्रारंभ होत आहे.

रॅफेल नदाल, रॉजर फेडरर, नोवाक जोकोवीच, अँडी मरे व स्टानिस्लास वॉवरिन्क या खेळाडूंनी २००५ पासून ग्रँड स्लॅम स्पर्धा गाजविल्या आहेत. यंदा युवा खेळाडूंनी काही एटीपी स्पर्धामध्ये आश्चर्यजनक विजयांची नोंद करीत या खेळाडूंना जणुकाही इशाराच दिला आहे. वीस वर्षीय खेळाडू अ‍ॅलेक्झांडर जेवेरेव्ह याने नुकत्याच झालेल्या इटालियन ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळविताना जोकोवीच याच्यावर सनसनाटी विजय मिळविला होता. याच स्पर्धेत डॉमिनिक थिम या २३ वर्षीय खेळाडूने नदालवर मात करीत सर्वाना चकित केले होते.

थिम म्हणाला,‘येथील विजेतेपदासाठी नदाल हा दावेदार आहे. जोकोवीच हा देखील विजेतेपदासाठी उत्सुक आहे. मरे हा देखील विजेतेपद मिळविण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे. या खेळाडूंमध्ये अव्वल स्थानासाठी चुरस असली तरीही मी येथे अनपेक्षित कामगिरी नोंदविण्याचा प्रयत्न करीन. प्रत्येक स्पर्धेत काही आश्चर्यनजक विजयाची नोंद होत असते. प्रेक्षकांना तेच अपेक्षित असते. युवा खेळाडूंनीही विजेतेपद मिळवावे अशी त्यांचीही अपेक्षा असते.’

अनुभवी व वरिष्ठ खेळाडूंबाबत थिम म्हणाला,की या महान खेळाडूंनी तिशी ओलांडली असली तरीही ते अजूनही अव्वल दर्जाचा खेळ करीत आहेत हीच खूप मोठी व आदर्शयुक्त कामगिरी आहे. अर्थात मिलोस राओनिक व केई निशिकोरी यांच्यासारखे खेळाडूही अव्वल दर्जाचा खेळ करीत आहेत.

थिम याने गतवर्षी येथील स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली होती. तेथे त्याला जोकोवीचकडून पराभव स्वीकारावा लागला होता.