खेळाचा विकास हा केवळ मोठमोठी स्टेडियम बांधून किंवा वातावरण निर्मिती करून होत नाही. त्यासाठी मैदाने टिकली पाहिजेत, असे सांगतानाच, मराठी क्रीडा पत्रकारितेच्या उत्कर्षांसाठी तेथील क्रीडा पत्रकारांना इंग्रजी माध्यमांतल्याप्रमाणेच संधी आणि वेतन मिळाले पाहिजे, असे उद्गार ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर यांनी काढले. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे मंगळवारी करमरकर यांना प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
क्रीडा क्षेत्रातील चार घटनांमुळे क्रीडा पत्रकारितेचे महत्त्व अधिक वाढले हे विशद करताना करमरकर म्हणाले की, ‘‘१९७१मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजमध्ये आश्चर्यकारक विजय मिळवला. त्यावेळी भारतीय संघ जेव्हा मायदेशात परतला, तेव्हा विमानतळापासून घर गाठायला त्यांना साडेतीन तास लागले होते. त्यानंतर क्रिकेटची प्रचंड लाट आली होती. मग इंदिरा गांधी आणि वसंत साठे यांच्या प्रयत्नांमुळे १९८२मध्ये एशियाडचे भारतात आयोजन करण्यात आले होते. या स्पध्रेच्या निमित्ताने ऑलिम्पिकचे प्रथमच देशाला दर्शन घडले. त्यानंतर १९८३मध्ये कपिलदेवच्या भारतीय संघाने चमत्कार घडवून विश्वचषक जिंकण्याची किमया साधल्यानंतर गेल्या वर्षी भारताने ऑलिम्पिकमध्ये कधी नव्हे ती सहा पदके जिंकण्याची किमया साधली. या सुवर्णक्षणांमुळेच क्रीडा क्षेत्राला चालना मिळाली.’’
क्रीडा पत्रकारिता हे पत्रकारितेचे आकर्षित करणारे, परंतु उपेक्षित असे अंग आहे. इंग्रजी क्रीडा पत्रकारितेशी नेहमीच मराठीची तुलना केली जाते. पण दुर्दैवाने मराठी क्रीडा पत्रकारांना इंग्रजी क्रीडा पत्रकारांइतकी संधी आणि वेतन दिले जात नाही. त्यांना अन्य पत्रकारांप्रमाणे योग्य बढत्या मिळत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
आकाशवाणी आणि दूरदर्शन ही सरकारी माध्यमे आहेत. क्रिकेट सामन्यांच्या इंग्रजी आणि हिंदी समालोचनाला तिथे योग्य न्याय दिला जातो. पण मराठी समालोचनाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, असे सांगून त्यांनी मुंबईत २०११ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्याचे उदाहरण दिले. ‘‘विश्वचषक सामना मुंबईत, पण त्या सामन्याच्या समालोचनात मात्र मराठीला स्थान नाही. अखेर शिशिर शिंदे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यामुळे दूरदर्शन सामना पाहून आकाशवाणीवर त्याचे धावते वर्णन करावे लागले. कारण वानखेडे स्टेडियममध्ये आयत्यावेळी मराठी समालोचकाची व्यवस्थाही होऊ शकली नव्हती,’’ असे ते म्हणाले. या पुरस्काराच्या निमित्ताने आचार्य अत्रे यांच्याशी नाते जोडले गेले, याबद्दल कृतज्ञता प्रकट करून करमरकर यांनी अत्रे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. शाल, श्रीफळ आणि पाच हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या समारंभाचे प्रमुख पाहुणे अरुण साधू यावेळी म्हणाले की, ‘‘करमरकर यांनी मराठी क्रीडा पत्रकारितेमध्ये गंभीर आणि तळमळीने लेखन केले. फुलणाऱ्या भाषेत त्यांनी लिहिण्याचे टाळले. त्यांच्या समालोचनाची भाषा आणि आवाज ओघवता असायचा. गुणवत्ता असलेले क्रिकेट लेखन त्यांनी केले. क्रीडा पत्रकारितेच्या आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक राजकीय नेत्यांना अंगावर घेतले. आपल्या लेखणीचे आसूड ओढले. त्या सर्वाचा रोष त्यांनी पत्करला.’’
वांद्रय़ाच्या साहित्य सहवासमध्ये करमरकर यांच्या शेजारीच राहणाऱ्या साधू यांनी करमरकर यांच्या विसराळूपणाचे किस्सेही यावेळी सांगितले. यावेळी करमरकर यांचा परिचय करून देताना ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी करमरकर यांच्या क्रीडा पत्रकारितेचा प्रवास आपल्या खुसखुशीत शैलीत मांडला. भारतीय क्रीडा क्षेत्राचा वेध घेणाऱ्या आणि क्रीडा पत्रकारांना मार्गदर्शक ठरणाऱ्या पुस्तकाचे करमरकर यांनी लेखन करावे, अशी भावना अनेकांनी याप्रसंगी व्यक्त केली.