Gautam Gambhir Dressing Room Celebration Video: भारताच्या युवा संघाने इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. शुबमन गिल आणि संघाने ओव्हल कसोटीत अवघ्या ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णाच्या भेदक गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांना पाचव्या दिवशी अवघ्या ३५ धावा करू दिल्या नाहीत अन् ओव्हल कसोटी आपल्या नावे केली. यादरम्यानचा भारताच्या ड्रेसिंग रूममधील व्हीडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे, ज्यामध्ये गौतम गंभीरच्या बोल्ड सेलिब्रेशनने सर्वांचं मन जिंकलं आहे.

ओव्हल कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघाचा जल्लोष पाहण्यासारखा होता. आता बीसीसीआयने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर खूप भावनिक झाले होते आणि विजयाचा आनंद साजरा करताना दिसले.

गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून, कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची कामगिरी फारशी चांगली राहलेली नाही. घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध विजय मिळवल्यानंतर, टीम इंडियाला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मानहानीकारक पराभवांना सामोरे जावे लागले. ज्यामुळे टीम इंडिया २०२५ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पोहोचू शकली नाही.

गौतम गंभीरचं कोचिंग स्टाफनंतर बोल्ड सेलिब्रेशन

बऱ्याच प्रतीक्षेनंतर, आता युवा खेळाडूंच्या टीम इंडियाने इंग्लंडच्या भूमीवर कसोटी मालिका अनिर्णित ठेवण्यात यश मिळवलं आहे. मोहम्मद सिराजने गस अ‍ॅटकिन्सनला क्लीन बोल्ड करताच ड्रेसिंग रूममध्ये एकच जल्लोष सुरू झाला. गौतम गंभीर विजय पाहून खूपच भावनिक झाला. त्याने प्रथम आक्रमक पद्धतीने आनंद साजरा केला, नंतर त्याने मॉर्ने मॉर्केलला मिठी मारली.

भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये अखेरच्या विकेटदरम्यान कसं होतं वातावरण?

ड्रेसिंग रूममध्ये अखेरच्या क्षणांमध्ये कोचिंग स्टाफमधील कोणताच व्यक्ती जागेवर बसला नव्हता. सर्वजण सातत्याने फेऱ्या मारत होते, मैदानावर लक्ष ठेवून होते. जशी सिराजने अखेरची विकेट घेतली, गौतम गंभीरने कोचिंग स्टाफला मिठी मारत जोरजोरात येस्स म्हणत जणू गर्जनाच केली. यानंतर त्याने मोर्ने मॉर्कल, बॅटिंग कोच सितांशु कोटक असं करत सर्वांना मिठी मारत आनंद साजरा केला.

गंभीरला इतकं बोल्ड सेलिब्रेशन करताना फार कमी वेळेस पाहिलं असेल. पण युवा भारतीय संघाच्या विजयानंतर मात्र गंभीरमधील एक वेगळी बाजू दिसली. आक्रमक सेलिब्रेशन करत त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.