Gautam Gambhir Fight With Oval Pitch Curator Video: भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचवा सामना ओव्हलच्या मैदानावर ३१ जुलैपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी सराव सत्रात मोठा वाद झालेला पाहायला मिळाला. भारतीय संघाचा कोच गौतम गंभीर आणि ओव्हल मैदानाचे पिच क्यूरेटर यांच्यात वाद झाला, ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.
टीम इंडिया २८ जुलैला मँचेस्टरहून लंडनला पोहोचली, जिथे मंगळवारी म्हणजेच २९ जुलै रोजी संघाचे पहिले सराव सत्र होते. पण या सराव सत्रात मोठा वाद पाहायला मिळाला. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर लंडन ओव्हलचे मुख्य क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात वाद झाला. गौतम गंभीर पिच क्युरेटर आणि ग्राऊंड स्टाफकडे बोट दाखवत म्हणाला, “आम्ही काय करायचं हे तुम्ही सांगायची गरज नाही.”
गौतम गंभीर पिच क्यूरेटवर संतापला
मँचेस्टरमधील चौथ्या सामन्यात भारताने शानदार पुनरागमन केले आणि सामना अनिर्णित राहिला. अखेरचा कसोटी सामना दोन दिवसांनी होणार आहे. सराव सत्रादरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये गंभीर क्युरेटरशी वाद घालताना दिसला. यानंतर, भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत करावी लागली.
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, फोर्टिसने गंभीरला सांगितलं की, “मी मॅच रेफरीकडे तुमची तक्रार करेन.” यावर भारतीय मुख्य प्रशिक्षकांनी अतिशय कठोर स्वरात उत्तर दिले, “जा कर तक्रार, तुला जे करायचं ते जा.”
त्यानंतर फलंदाजी कोच कोटक यांनी हस्तक्षेप केला आणि फोर्टिसला एका बाजूला नेलं आणि म्हणाले, “आम्ही काहीही नुकसान करणार नाही.” गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल आणि सहाय्यक प्रशिक्षक रायनसारखे इतर भारतीय संघाचे सपोर्ट स्टाफ देखील तिथे उपस्थित होते.
पिच क्युरेटरने भारतीय संघाच्या प्रशिक्षकांना आणि फलंदाजी कोचला खेळपट्टीपासून लांब उभं राहण्यास सांगितलं. ज्यावरून गौतम गंभीर त्याच्यावर चांगलाच संतापलेला दिसला. गंभीर आणि फोर्टिसमध्ये सरावासाठी खेळपट्ट्यांवरून वाद होताना दिसला. गंभीरने पुन्हा फोर्टिसला सांगितलं की त्याने संघाला “काय करावे” हे सांगू नये. व्हिडिओमध्ये गंभीर असे म्हणताना दिसत आहे की, “आम्ही काय करायचं हे तू सांगू नकोस, तू एक ग्राऊंडसमन आहेस. यानंतर फोर्टिस तिथून निघून गेला आणि गंभीर नेट सेशन पाहताना दिसला.
भारतीय संघासाठी महत्त्वाचा सामना
इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत १-२ ने पिछाडीवर आहे, त्यामुळे मालिका अनिर्णित राहण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागेल. सामना अनिर्णित राहिला तरी टीम इंडिया मालिका गमावेल. चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा टीम इंडियाने गेल्या दौऱ्यात केनिंग्टन ओव्हल येथे कसोटी सामना खेळला आहे तेव्हा भारताने विजय मिळवला आहे.