ओव्हल कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडचा सहा धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने इंग्लंडला ३७४ धावांच्या प्रत्युत्तरात ३६७ धावांवर गुंडाळले. भारताचे गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाला हा विजय मिळवता आला आहे. भारताच्या या विजयानंतर टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने मोठं वक्तव्य दिलं आहे.
मोहम्मद सिराजने जादुई चेंडूवर गस एटकिन्सला क्लीन बोल्ड करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. भारताचा विजय पाहून एकच सर्वांनी जल्लोष केला. तर ड्रेसिंग रूममध्येही सपोर्ट स्टाफ आणि भारताच्या खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारत सेलिब्रेशन केलं.
भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर कोच गौतम गंभीर काय म्हणाला?
ओव्हलच्या मैदानावर रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर आणि मालिका बरोबरीत आणल्यानंतर, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये गंभीरने लिहिलं की, संघ कधीही कोणासमोर झुकणार नाही.
गौतम गंभीरने भारताच्या विजयाचे काही फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, “आम्ही कधी जिंकू, कधी आम्ही पराभूत होऊ, पण कधीच आम्ही झुकणार नाही. कमाल खेळलात पोरांनो.”
ओव्हल कसोटीत दोन्ही संघांमध्ये खूपच रोमांचक सामना झाला. एका वेळेला पाचव्या कसोटीत इंग्लंडचा विजय निश्चित वाटत होता, पण मोहम्मद सिराजने शेवटच्या डावात पाच विकेट्स घेत सामन्याचं चित्र पालटलं. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या उर्वरित सात विकेट ६७ धावांच्या आत घेतल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडला पाचव्या दिवशी ३५ धावांची गरज होती आणि भारताला ४ विकेट हवे होते.
मोहम्मद सिराजने पाचव्या दिवसाच्या त्याच्या स्पेलमधील पहिल्याच षटकात जेमी ओव्हरटनला माघारी धाडलं आणि पुढच्या षटकात जेमी स्मिथचा बळी घेतला. यानंतर प्रसिध कृष्णाने जोश टंगला क्लीन बोल्ड करत बाद केलं. इंग्लंडने आपला ९वा बळी गमावला, तेव्हा त्यांनी ३५७ धावा केल्या होत्या आणि संघ विजयाच्या अगदी जवळ होता. गस एटकिन्सन आणि ख्रिस वोक्स इंग्लंडला विजयाच्या जवळ घेऊन गेले.
जेव्हा इंग्लंडचा संघ विजयापासून फक्त ६ धावा दूर होता तेव्हा सर्वांच्या नजरा सिराजच्या पुढच्या षटकावर होत्या. सिराजने यानंतर पहिल्याच जादुई चेंडूवर एटकिन्सनला क्लीन बोल्ड करत संघाला विजय मिळवून दिला.