नदालचे संस्थान खालसा

फॅबिओ फॉगनिनीचा खळबळजनक विजय

सेरेना विल्यम्सचा विजयासाठी संघर्ष
जोकोव्हित, चिलीचची आगेकूच

२००५ पासून दर वर्षी किमान एक ग्रँड स्लॅम जेतेपद नावावर करणाऱ्या जिगरबाज राफेल नदालचे संस्थान खालसा झाले. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत इटलीच्या फॅबिओ फॉगनिनीने पाचव्या सेटपर्यंत रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत नदालवर विजय मिळवत इतिहास घडवला. अन्य लढतीत नोव्हाक जोकोव्हिच आणि गतविजेता मारिन चिलीच यांनी सहज विजय मिळवले. महिलांमध्ये सेरेना विल्यम्सला विजयासाठी संघर्ष करावा लागला.
३२व्या मानांकित फॅबिओने तब्बल १४ ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असलेल्या आठव्या मानांकित नदालवर ३-६, ४-६, ६-४, ६-३, ६-४ असा आश्चर्यकारक विजय मिळवला. दोन सेटची भक्कम आघाडी घेतल्यानंतर सामना गमावण्याची नामुष्की नदालवर ओढवली. यंदाच्या वर्षी नदालला आपल्या बालेकिल्यात अर्थात फ्रेंच खुल्या स्पर्धेत नऊ वर्षांनंतर पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर विम्बल्डन स्पर्धेतही प्राथमिक फेरीतच त्याला गाशा गुंडाळावा लागला होता. जिंकण्यासाठीची विजिगीषु वृत्ती कायम असलेला, मात्र दुखापतींनी जर्जर झालेल्या नदालच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२००५ मध्ये अमेरिकन खुल्या स्पर्धेत नदालला तिसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर दशकभरानंतर इतक्या झटपट माघारी परतण्याची वेळ नदालवर पहिल्यांदाच ओढवली आहे. ग्रँड स्लॅम सामन्यांमध्ये दोन सेट जिंकल्यानंतर निर्विवाद विजय साकारण्याचा विक्रम नदालच्या नावावर होता. मात्र या अनपेक्षित पराभवाने नदालरूपी चमत्कारालाही मर्यादा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
फॉगनिनीची पुढची लढत स्पेनच्या फेलिसिआनो लोपेझशी होणार आहे. लोपेझने १०व्या मानांकित मिलास राओनिकचे आव्हान ६-२, ७-६ (७-४), ६-३ असे संपुष्टात आणले. यंदाच्या वर्षांत फॉगनिनीने रिओ दी जानेरो आणि बार्सिलोना येथे झालेल्या लढतीत नदालवर मात केली होती. मात्र हॅम्बर्ग येथे झालेल्या स्पर्धेत नदालने या पराभवांची परतफेड केली होती. हार्डकोर्ट पृष्ठभागावर अव्वल दहा मानांकित खेळाडूला नमवण्याची फॉगनिनीची ही पहिलीच वेळ आहे. २००५ नंतर अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या अंतिम १६ मध्ये धडक मारणारा फॉगनिनी इटलीचा पहिलाच खेळाडू आहे.
नोव्हाक जोकोव्हिचने आंद्रेआ सेप्पीवर ६-३, ७-५, ७-५ अशी मात करत चौथी फेरी गाठली. मारिन चिलीचने मिखाइल कुकुशकिनला ६-७, ७-६, ६-३, ६-७, ६-१ असे नमवले. जो विलफ्रेड सोंगाने स्टॅकोव्हस्कीचा ६-३, ७-५, ६-२ असा पराभव केला.
महिलांमध्ये सेरेना विल्यम्सने बेथानी मॅटेक सँड्सवर ३-६, ७-५, ६-० अशी मात केली. व्हीनस विल्यम्सने बेनिंडा बेनकिकचा ६-३, ६-४ असा धुव्वा उडवला. मॅडिसन की हिने अ‍ॅग्निझेस्का रडवानस्कावर ६-३, ६-२ असा विजय मिळवला.

फॅबिओने शानदार खेळ केला. मी हरलो यापेक्षा तो जिंकला असे म्हणणे योग्य ठरेल. मी वाईट खेळ केला नाही, शेवटपर्यंत झुंज दिली, पण ती पुरेशी नव्हती.
– राफेल नदाल

मला किती आनंद झाला आहे याचे मी शब्दांत वर्णन करू शकत नाही. नदालविरुद्ध सामना जिंकणे खडतर आहे. मी दोन सेटनी पिछाडीवर होतो. त्या परिस्थितीतून सामना जिंकू शकलो हे अद्भुत आहे.
– फॅबिओ फॉगनिनी

पेस, सानिया पराभूत
लिएण्डर पेस आणि सानिया मिर्झा यांना अमेरिकन खुली टेनिस स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले. मिश्र दुहेरीत आंद्रेआ लाव्हाकोव्हा आणि ल्युकाझ कुबोट जोडीने सानिया मिर्झा आणि ब्रुनो सोरेस जोडीवर ६-३, ६-३ असा विजय मिळवला. पुरुष दुहेरीत स्टीव्ह जॉन्सन आणि सॅम क्वेरी जोडीने पेस आणि फर्नाडो व्हर्डास्को जोडीवर ७-५, ४-६, ६-३ अशी मात केली.