आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी संघटनेचे अध्यक्ष जिआनी इन्फॅन्टिनो यांच्याविरुद्ध कोणताही चौकशी तपास सुरू नसल्याचे फिफाने स्पष्ट केले आहे. जर्मनीतील एका वृत्तपत्राने अशा स्वरुपाची चौकशी सुरु असल्याचे वृत्त दिले होते. गेल्या महिन्यात मेक्सिको येथे झालेल्या फिफाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीचे इतिवृत्त नष्ट करण्याचा कथित आरोप इन्फॅन्टिनो यांच्यावर आहे.
दरम्यान, याप्रकरणी फिफाची स्वतंत्र आचारसंहिता समिती कार्यरत असून, इन्फॅन्टिनो दोषी आढळल्यास त्यांच्यावर ९० दिवसांच्या बंदीची कारवाई होऊ शकते. मात्र या समितीचे प्रवक्ता रोमन गेइसर यांनी इन्फॅन्टिनो यांच्याविरुद्ध कोणताही औपचारिक चौकशी सुरु नसल्याचे स्पष्ट केले. फिफाच्या प्रवक्त्या डेलिआ फिशर यांनी हे वृत्त तथ्यहीन असल्याचे सांगितले.
महाघोटाळा प्रकरणानंतर पहिल्यांदाच मेक्सिको येथे फिफाच्या कार्यकारिणी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याआधी २६ फेब्रुवारी येथे झालेल्या बैठकीत सेप ब्लाटर यांच्यानंतरचे अध्यक्ष म्हणून इन्फॅन्टिनो यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. मेक्सिको येथे झालेल्या बैठकीत संघटनेच्या लेखा परीक्षण समितीच्या प्रमुख डोमिनिको स्केला यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. स्केला यांनी इन्फॅन्टिनो यांच्यावर फिफाच्या महत्त्वपूर्ण समित्यांच्या कामकाजावर प्रभाव टाकल्याचा आरोप केला होता. मानधनाच्या मुद्यावरुन स्केला आणि इन्फॅन्टिनो यांच्यात खडाजंगी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.