महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारेची प्रतिक्रिया

सुप्रिया दाबके, लोकसत्ता

मुंबई : जागतिक, राष्ट्रकुल आणि आशियाई कुस्ती स्पर्धेत पदके मिळवली आहेत. मात्र त्यामध्ये ऑलिम्पिक पदकाचीच उणीव आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय मल्ल राहुल आवारेने दिली. राहुलचा टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्रतेचा मार्ग खडतर असला तरी तो अजूनही आशावादी आहे.

राहुलने नुकत्याच नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ६१ किलो या बिगरऑलिम्पिक वजनी गटात कांस्यपदक मिळवले. मात्र सुवर्णपदक हुकल्याची उणीव राहुलने बोलून दाखवली. ‘‘कांस्यपदक जिंकता आल्याचा निश्चित आनंद आहे. मात्र सुवर्णपदक जिंकता आले असते तर जास्त चांगले झाले असते. उपांत्य लढतीत मी ज्या प्रतिस्पध्र्याकडून हरलो, त्याला अनेकांनी नमवले होते. त्यामुळे पराभव अपेक्षित नव्हता. मात्र एका सेकंदासाठी लक्ष विचलित झाले आणि मी लढत हरलो. त्याआधीच्या लढतींमध्येदेखील केलेल्या काही चुकांमुळे उपांत्य फेरीतच आव्हान संपुष्टात आले,’’ असे राहुलने कामगिरीचे विश्लेषण केले.

गेल्या वर्षी जागतिक कुस्ती स्पर्धेत राहुलने ५७ किलोऐवजी ६१ किलो वजनी गटात सहभाग घेतला. ६१ किलो वजनी गट अर्थातच ऑलिम्पिकमध्ये नाही. त्या वेळेस रवी कुमार दहियाने जागतिक कुस्ती स्पर्धेत ५७ किलो गटातून कांस्यपदक मिळवले. याबरोबरच टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्रतेचा रवी कुमारचा मार्ग मोकळा झाला. मात्र अजूनही पात्रता लढत खेळवण्याची मागणी राहुल करत आहे. ‘‘ऑलिम्पिकसाठी पात्रता कठीण असली तरी भारतीय कुस्ती महासंघाकडे रवी कुमार दहियाविरुद्ध पात्रता लढत खेळवावी. पात्रता लढतीतील निकालावर ऑलिम्पिक पात्रता स्पर्धामध्ये संधी द्यावी,’’ अशी मागणी बीडचा राहुल करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वडील बाळासाहेब आवारे यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतलेल्या राहुलने २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्यात गेल्या वर्षी जागतिक स्पर्धेतील कांस्यपदकाची भर पडली. त्यातच कधी ५७ किलो आणि कधी ६१ किलो अशा गटांमध्ये सहभागी होताना तंदुरुस्ती राखण्याचे आव्हान राहुलसमोर असते. मात्र ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत पात्र ठरलो नसल्याची उणीव सतत त्याच्या बोलण्यातून दिसते. ‘‘माझ्या वडिलांनी मला कुस्तीचे धडे दिले. ते स्वत: राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू होते. कुस्ती खेळून ऑलिम्पिक पदक मिळव, हीच माझ्या कुटुंबाची अपेक्षा आहे. मात्र सध्या तरी ऑलिम्पिकचे स्वप्न हे स्वप्नच आहे,’’ असे राहुलने सांगितले.