घरच्या मैदानावर सलग दोन कसोटी सामन्यांत भारतीय संघाने पत्करलेल्या पराभवाच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय निवड समितीने कडक पावले उचलली आहेत. गुरुवारपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि मधल्या फळीतील फलंदाज युवराज सिंग यांना वगळण्यात आले आहे.
कोलकात्याच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू न शकलेला ऑफ-स्पिनर हरभजन सिंगलाही निवड समितीने वगळले आहे. त्याच्याऐवजी लेग-स्पिनर पीयूष चावला याला संधी देण्यात आली आहे. याचप्रमाणे दिल्लीचा वेगवान गोलंदाज परविंदर अवानाने झहीरची, तर सौराष्ट्रचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने युवराजची जागा घेतली आहे.
याचप्रमाणे निवड समितीने पुणे (२० डिसेंबर) आणि मुंबई (२२ डिसेंबर) या ठिकाणी होणाऱ्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठीभारतीय संघाची घोषणा रविवारी केली. वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खान यांचा या संघात समावेश नाही. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हे दोघेही ट्वेन्टी-२० मालिकेसाठी अनुपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू भुवनेश्वर कुमार आणि अवाना यांनी संघान स्थान मिळवले आहे.
‘‘निवड प्रक्रियेबाबत मला भाष्य करायचे नाही. संघ जेव्हा हरतो, तेव्हा कोणीही आनंदी नसतो. आम्ही याबाबत गांभीर्याने विचार करीत आहोत,’’ असे बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांनी सांगितले.
आयपीएल आणि रणजी क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे जडेजाने भारतीय संघात स्थान प्राप्त केले आहे, तर अवानाच्या स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीने निवड समिती सदस्यांचे लक्ष वेधले आहे. मुंबई आणि कोलकाता कसोटी सामन्यांमधील पराभवानंतर निवड समितीने चौथ्या कसोटीसाठी झहीर आणि युवराजला डच्चू देत एक प्रकारे कामगिरी सुधारा, असा इशाराच दिला आहे. या दोन्ही कसोटी सामन्यांत आपल्या फिरकीचा अपेक्षित प्रभाव टाकू शकले नसले तरी आर. अश्विन आणि प्रग्यान ओझा यांनी आपले स्थान टिकविले आहे. ऑफ-स्पिनर अश्विन या मालिकेत गोलंदाज म्हणून जरी अपयशी ठरला असला तरी या मालिकेत त्याने फलंदाज म्हणून आपले महत्त्व पटवून दिले आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यामधील दुसऱ्या डावात त्याने नाबाद ९१ धावांची झुंजार खेळी साकारून आपले स्थान बळकट केले.
कसोटीमध्ये भारताची मधली फळी सातत्याने अपयशी होत असल्यामुळे अष्टपैलू जडेजाला संघात स्थान देण्यात आले आहे. विराट कोहलीला या मालिकेत अद्याप चांगली कामगिरी दाखवता आलेली नाही. कोलकात्याच्या पहिल्या डावात साकारलेल्या ७६ धावांच्या खेळीव्यतिरिक्त सचिन तेंडुलकरकडूनही सातत्यपूर्ण फलंदाजी झालेली नाही.
कोलकाता कसोटीत झहीरला ३१ षटकांत फक्त एक बळी मिळाला. याचप्रमाणे या मालिकेतील तीन कसोटी सामन्यांत झहीरच्या खात्यावर फक्त ४ बळी जमा होते. त्यामुळेच त्याला वगळण्यात आले. ईडन गार्डन्स इंग्लंडचे वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिन आणि जेम्स अँडरसन यांच्यासाठी नंदनवन ठरले. पण झहीरला मात्र तिथे बळी मिळविण्यासाठी झगडावे लागत होते. त्यामुळे त्याला अर्धचंद्र देण्यात आला आहे. त्यामुळे नागपूर कसोटीमध्ये अशोक दिंडा किंवा अवाना यांच्यापैकी एकाला किंवा दोघांनाही संधी मिळू शकेल. कारण इशांत शर्माही अद्याप आपला प्रभाव पाडू शकलेला नाही. त्याचेही अंतिम चमूमधील स्थान अनिश्चित आहे.
यंदाच्या रणजी हंगामात अनुक्रमे गुजरात आणि रेल्वेविरुद्ध अशी दोन त्रिशतके साकारणारा जडेजा चांगलाच फॉर्मात आहे. जडेजा तीन त्रिशतके झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. या त्याच्या कामगिरीमुळेच तो संघात स्थान मिळवू शकला.
मागील रणजी हंगामात अव्वल तीन सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अवानाचा समावेश होता. यंदाच्या हंगामातही आपले सातत्य टिकवून ठेवत अवाना याने दोन सामन्यांत पाच बळी घेण्याची किमया साधली आहे.
चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, पीयूष चावला, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, अशोक दिंडा, मुरली विजय, परविंदर अवाना.
ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, युवराज सिंग, मनोज तिवारी, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, पीयूष चावला, अशोक दिंडा, भुवनेश्वर कुमार, लक्ष्मीपती बालाजी, परविंदर अवाना.
जडेजाची अष्टपैलू कामगिरी
राजकोट : गोलंदाजीत चार बळी आणि फलंदाजीत नाबाद ६७ धावा या रवींद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर सौराष्ट्रने बंगालविरुद्धच्या सामन्यात विजयाकडे कूच केली आहे. जडेजाच्या (४८ धावांत ४ बळी) गोलंदाजीच्या बळावर बंगालचा पहिला डाव सौराष्ट्रने फक्त ११२ धावांत गुंडाळला. ९७ धावांची आघाडी घेणाऱ्या सौराष्ट्रने त्यानंतर ४ बाद १३४ अशी मजल मारली.
अवानाच्या ७४ धावा
बंगळुरू : परविंदर अवानाच्या ७४ धावांच्या बळावर दिल्लीने कर्नाटकविरुद्धच्या रणजी सामन्यात पहिल्या डावात ६६ धावांची आघाउी घेतली आहे. दिल्लीचा पहिला डाव २५८ धावांवर संपल्यानंतर कर्नाटकने दुसऱ्या डावात बिनबाद ३६ अशी मजल मारली.
संग्रहित लेख, दिनांक 10th Dec 2012 रोजी प्रकाशित
नागपूरच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी निवड समितीची कडक पावले
घरच्या मैदानावर सलग दोन कसोटी सामन्यांत भारतीय संघाने पत्करलेल्या पराभवाच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय निवड समितीने कडक पावले उचलली आहेत.

First published on: 10-12-2012 at 12:53 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbhajan singh yuvraj zaheer out after eden debacle