दोन महिन्याच्या दौऱ्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहचला आहे. पुढील काही दिवस विलगीकरणात राहणार आहे. चार कसोटी सामन्याची सुरुवात १७ डिसेंबरपासून होणार आहेत. अ‍ॅडलेडची पहिली कसोटी संपल्यानंतर म्हणजे २१ डिसेंबरनंतर कोहली मायदेशी परतणार आहे. उर्वरीत सामन्यात अजिंक्य रहाणे भारतीय संघाची कमान संभाळणार आहे. त्यापूर्वीच भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीबाबत ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेननं वक्तव्य केलं आहे. पेन म्हणाला की, ‘क्रिकेट चाहता म्हणून विराट कोहलीची फलंदाजी पाहायला खूप मजा येते.’

एबीसी स्पोर्ट्ससोबत बोलताना ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेन म्हणाला की, “विराट कोहलीबाबत मला अनेक प्रश्न विचारले जातात. पण विराट कोहली माझ्यासाठी इतर खेळाडूंप्रमाणेच आहे. खरं बोलायचं झाल्यास विराट कोहली आणि माझ्या खास काही नातं नाही. नाणेफेकीवेळी पाहतो आणि त्याच्याविरोधात क्रिकेट खेळतो. फक्त इतकेच आहे. यापैक्षा जास्त काही नाही. विराट कोहलीचा आम्ही द्वेष करतो, ही चांगली मस्करी होती. पण एक क्रिकेट चाहता म्हणून विराट कोहलीची फलंदाजी पाहायाला मजा येते. मात्र, क्रिकेटर म्हणून त्यानं जास्त धावा काढू नयेत असं वाटतं”

कोहलीची अनुपस्थिती धोकादायक!
पितृत्वाच्या रजेमुळे चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीन कसोटी सामन्यांना मुकणारा भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या भूमिकेचा आदर करायलाच हवा. परंतु प्रतिष्ठा पणाला असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत कोहलीची अनुपस्थिती भारतासाठी धोकादायक ठरू शकेल, असा सावधगिरीचा इशारा ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी दिला आहे.