दक्षिण आफ्रिकेचे माजी ऑलिम्पिकपटू ग्रेग क्लार्क यांची भारतीय कनिष्ठ हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. या वर्षी अखेरीस होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीसाठी क्लार्क भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत. पहिल्यावहिल्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेत विजेत्या रांची ऱ्हिनोज संघाचे प्रशिक्षकपद क्लार्क यांनी भूषवले होते. क्लार्क यांनी सात वर्षे दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली होती.  
१३ एप्रिलपासून क्लार्क कार्यभार स्वीकारणार आहेत. हॉकी इंडिया लीगमध्ये रांची ऱ्हिनोजचे प्रशिक्षकपद भूषवल्यानंतर भारतीय हॉकीचे भविष्य उज्ज्वल असल्याचे मला जाणवले होते. बलजीत सिंग आणि अन्य सहकाऱ्यांसमवेत काम करण्यासाठी मी उत्सुक असल्याचे क्लार्क यांनी सांगितले.
क्लार्क यांनी १९८८ अटलांटा तसेच २००४ अथेन्स ऑलिम्पिकमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे. खेळाडूंना तांत्रिकदृष्टय़ा तसेच मानसिकदृष्टय़ा सक्षम करू शकतील अशा व्यक्तीच्या आम्ही शोधात होतो. कनिष्ठ गट विश्वचषकाचे यजमान या नात्याने भारतीय संघावर जबाबदारी आहे. क्लार्क या युवा संघाला चांगले मार्गदर्शन करतील असा विश्वास हॉकी इंडियाचे महासचिव नरिंदर बात्रा यांनी सांगितले.