भुवनेश्वर : शरदानंद तिवारीने केलेल्या गोलच्या जोरावर भारताने बलाढय़ बेल्जियमवर १-० अशी सरशी साधत कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. या फेरीत गतविजेत्या भारतापुढे जर्मनीचे आव्हान असेल.

लखनऊ येथे २०१६ साली झालेल्या मागील कनिष्ठ विश्वचषकात भारताने बेल्जियमलाच धूळ चारत दुसऱ्यांदा जगज्जेते होण्याचा मान मिळवला होता. या पराभवाची परतफेड करण्यासाठी बेल्जियमचा युवा संघ उत्सुक होता. परंतु भारताने शरदानंदचा गोल, भक्कम बचाव आणि राखीव गोलरक्षक पवनच्या उत्कृष्ट खेळामुळे पुन्हा बेल्जियमवर वर्चस्व गाजवले.

भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर झालेल्या या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्याच्या सुरुवातीला बेल्जियमने आक्रमक शैलीत खेळ केला. मात्र, त्यांचे आक्रमण थोपवण्यात भारताच्या बचाव फळीला यश आले. पहिल्या सत्रात भारताच्या उत्तम सिंहने गोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने मारलेला फटका बेल्जियमचा गोलरक्षक बोरिस फेल्डहॅमने अडवला. भारताला दुसऱ्या सत्रात २१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर शरदानंदने गोल केल्यामुळे यजमानांना १-० अशी आघाडी मिळाली. मध्यंतरानंतर बेल्जियमच्या आक्रमणाला अधिक धार आली. त्यातच भारताने चेंडूवर ताबा ठेवण्याच्या प्रयत्नात चुका केल्या. चौथ्या सत्रात प्रशांत चौहानच्या जागी मैदानात आलेल्या राखीव गोलरक्षक पवनने रोमन दुवेकोट आणि डीने डी विंटरला गोल करण्यापासून रोखत भारताला सामना जिंकवून दिला.

उपांत्य फेरीचे सामने

(शुक्रवार ३ डिसेंबर)

’  भारत विरुद्ध जर्मनी

’  अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स