माझ्यावर ‘मोका’अंतर्गत आरोप निश्चित करणे अतिशय अन्यायकारक आहे. मी दहशतवादी नाही, क्रिकेटपटू आहे, असे स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी अंतरिम जामिनीवर सुटलेल्या अजित चंडिलाने म्हटले आहे. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंना अटक करण्यात आली होती. यामध्ये चंडिलाचा समावेश होता. चंडिलाच्या मोठय़ा भावाचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्याच्या अंत्यविधी कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता चंडिलाला ३ ते ५ ऑगस्ट या कालावधीत अंतरिम जामीन देण्यात आला होता.
‘‘एक चांगला क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न मी पाहिले होते आणि काही प्रमाणात ते प्रत्यक्षात साकारलेही. पण यानंतर एका दुख:द घटना घडली आणि माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला. आयपीएलमध्ये शेवटच्या दोन हंगामांतील माझी कामगिरी लोकांनी पाहिली आहे. मी निर्दोष आहे आणि न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे,’’ असे चंडिलाने सांगितले.
‘‘मोक्काअंतर्गत माझ्यावर खटला दाखला करण्यात येणार असल्याचे समजल्यावर मी आणि माझ्या कुटुंबियांना धक्का बसला. माझ्या कुटुंबियांनी याप्रकरणी खूप काही सोसले आहे. ज्या दिवशी मला अटक करण्यात आली, त्याच दिवशी माझ्या भावाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मला माझ्या कुटुंबियांचा पाठिंबा होता. लवकरच लोकांना सत्य काय ते कळेल. मी निर्दोष असून मी लवकरच पुनरागमन करेन,’’ असा विश्वास चंडिलाने व्यक्त केला.
‘‘स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाविषयी मला काहीही कल्पना नाही. माझ्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही. या प्रकरणाबाबत मला काहीच माहिती नाही,’’ असे चंडिला म्हणाला. उच्चभ्रू राहणीमानाविषयी विचारले असता चंडिलाने सांगितले की, ‘‘आयपीएलमध्ये खेळाडूंना चांगला पैसा मिळतो. त्यामुळे हे राहणीमान खेळाडूंना परवडू शकते. आयपीएल खेळून मोठय़ा प्रमाणावर पैसा मिळत असल्याने आणखी पैशासाठी वाईट काम करण्याची गरजच नाही. प्रत्येकाला चांगले कपडे परिधान करायला, महागडय़ा वस्तू वापरायला आवडतात. किंमती वस्तू वापरण्यात काहीही गैर नाही. त्यामुळे अशा वस्तूंवर मी पैसे खर्च करत असेन तर तो माझा वैयक्तिक मुद्दा आहे, अन्य कोणालाही त्याबाबत काळजी करण्याचे कारण नाही,’’ असे चंडिलाने स्पष्ट केले.
दरम्यान, स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अंकित चव्हाण आणि एस.श्रीशांत यांना अटक केली होती. या दोघांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे मात्र चंडिला अजूनही तुरुंगातच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am a cricketer not a terrorist ajit chandila
First published on: 06-08-2013 at 05:08 IST