आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) अध्यक्षपद भूषविण्याइतका मी हुशार नाही, असे मत वर्षांतील सवरेत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावणाऱ्या ख्रिस्तिआनो रोनाल्डोने व्यक्त केले. आपल्या आगामी ‘रोनाल्डो’ या चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता. भविष्यात फुटबॉल प्रशासक म्हणून काम करण्याची इच्छा नसल्याचे त्याने स्पष्ट केले. ‘‘फिफा अध्यक्षपदाची जबाबदारी मला पेलवणार नाही, तेवढा हुशार मी नक्कीच नाही. भविष्यात काय होईल याची चिंता नाही. अजून काही वष्रे मी फुटबॉल खेळू शकतो. भविष्यात फिफाचा अध्यक्ष बनण्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण प्रकल्प माझ्याकडे आहेत,’’ असे तो म्हणाला. या चित्रपटात रोनाल्डोच्या आयुष्याचा पूर्ण पट उलगडला गेला आहे. त्यात त्याची आई मारिया डोलोरेस डॉस, भाऊ आणि दिवंगत वडील यांच्याबाबतही सांगण्यात आले आहे. तसेच आपल्या मुलाची माहिती सार्वजनिक न करण्याच्या निर्णयाचे रोनाल्डोने समर्थन केले. यावेळी त्याने लिओनेल मेस्सी आणि स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याबाबत मनमोकळेपणाने चर्चा केली. बार्सिलोनाचा खेळाडू लिओनेल मेस्सीविरुद्ध असलेल्या स्पध्रेविषयी तो म्हणाला, ‘‘मी मेस्सीला प्रतिस्पर्धी म्हणून नाही, तर व्यक्ती म्हणून पाहत आलो आहे, परंतु आमच्यात श्रेष्ठत्वाची शर्यत सुरूच राहणार.’’