दुखापतीवर उपचार घेण्यासाठी भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा मेलबर्नला रवाना झाला आहे, अशी चर्चा होती. पण मी जायबंदी झालो नसून खडतर सरावासाठी मेलबर्नला आलो आहे, असे इशांतने ‘ट्विटर’द्वारे जाहीर करत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
मायदेशात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण कसोटी मालिकेआधी इशांतच्या डाव्या पायाचा गुडघा दुखावला असून तो तज्ज्ञांकडून उपचार करवून घेण्यासाठी मेलबर्नला गेला आहे, अशी चर्चा दिवसभर सुरू होती. पण खुद्द इशांतनेच आपण ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी सज्ज होण्याकरिता मेलबर्नला आल्याचे ‘ट्विटर’द्वारे सांगितले. गेल्या वर्षी मार्च महिन्यात इशांतच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे ऑगस्टपर्यंत व्यावसायिक क्रिकेटपासून दूर होती. मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याने भारतीय संघात पुनरागमन केले. पण त्याला अंतिम संघात स्थान मिळू शकले नाही. अखेर डिसेंबरमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात त्याची वर्णी लागली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेआधी भारतीय संघाला झहीर खानच्या रूपाने आधीच धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटी मालिकेत जायबंदी झालेला झहीर अद्याप दुखापतीतून सावरला नसून त्याने गोलंदाजीला सुरुवात केलेली नाही.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळणारा वेगवान गोलंदाज उमेश यादवलाही पाठीच्या दुखण्याने सतावले आहे. वेगवान गोलंदाज वरुण आरोनसुद्धा पाठीच्या दुखापतीवर सल्ला घेण्यासाठी पुढील आठवडय़ात लंडनला रवाना होणार आहे.