भारत-पाकिस्तान सामन्यात कोणताही संघ जिंकला की त्यानंतर होणारं चाहत्यांच सेलिब्रेशन हे नेहमी बघण्यासारख असतं. रविवारी चॅम्पियन्स करंडकात भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकणार आहेत. पण त्याआधीच भारतीय पाठीराख्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.

बर्मिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात केली. यानंतर मैदानाबाहेर भारतीय संघांच्या चाहत्यांनी पाकिस्तानची एक बस अडवून त्यासमोर आपल्या विजयाचं सेलिब्रेशन केलं. जोरजोरात ढोल वाजवत, भांगड्यावर नृत्य करत भारतीय पाठीराख्यांनी काहीकाळ परिसर दणाणून सोडला. यादरम्यान बर्मिंगहॅम मैदानाच्या बाहेर फक्त फक्त आणि भारतीय चाहते आणि त्यांचा नाच हेच पहायला मिळत होतं.

यादरम्यान काहीकाळ वाहतुकीची कोंडीही पहायला मिळाली. काहींनी या बससमोरच सेल्फी काढून आपला आनंद साजरा केला. तर काही चाहते ”मौका-मौका” हे गाणं म्हणत थेट पाकिस्तानच्या बसमध्येही शिरले. यादरम्यान कोणताही अनुचित प्रसंग घडला नाही. पाकिस्तानी बसमधल्या चाहत्यांनीही हा प्रकार खुल्यादिलाने समजून घेतला.

भारत-पाकिस्तान यांच्यात उद्या अंतिम सामना रंगणार आहे. ओव्हलच्या मैदानात विराट कोहलीची टीम इंडिया तर सरफराज अहमदची टीम पाकिस्तान एकमेकांसमोर उभ्या ठाकतील. हा सामना इतर भारत-पाक सामन्यांप्रमाणे उत्कंठावर्धक होईल यात काही शंकाच नाही. मात्र सामन्यानंतर कोणत्या संघाचे पाठीराखे परत सेलिब्रेशन करण्याचा असाच मौका साधतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.