भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की क्रिकेट चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात बऱ्याच कालावधीपासून मालिका रंगलेली नाही. त्यामुळे या दोन्ही संघांमधील काँटे की टक्कर क्रिकेट रसिकांना कमीच पाहायला मिळते. वर्ल्डकप, चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्येच भारत-पाकिस्तानचे संघ आता आमनेसामने उभे ठाकताना दिसतात. मात्र जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ समोरासमोर येतात, तेव्हा तेव्हा क्रिकेट रसिकांना रंगतदार सामन्याची पर्वणी मिळते. आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेला सुरुवात झाल्याने क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामना पाहायला मिळणार आहे.

आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेला १ जूनपासून सुरुवात झाली आहे. आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होताच भारत आणि पाकिस्तानमध्ये केव्हा मुकाबला रंगणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात निर्माण झाला. भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत एकाच गटात असल्याने क्रिकेट रसिकांना प्रचंड आनंद झाला. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान स्पर्धेतील पहिलाच सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.

आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील पहिलाच सामना एकमेकांविरुद्ध असल्याने स्पर्धेची विजयी सुरुवात करण्याचे आव्हान दोन्ही संघांसमोर असेल. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा, पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांसमोर पहिला सामना, गटातील इतर संघही तितकेच तगडे असल्याने विजयाची नितांत आवश्यकता, या परिस्थितीत दोन्ही संघ भिडत असल्याने क्रिकेट चाहत्यांना रंगतदार सामन्याची अपेक्षा आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यात झालेल्या मागील पाचपैकी चार सामन्यांमध्ये भारताने बाजी मारल्याने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतही भारतीय क्रिकेट चाहत्यांना संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील सामना कोणत्या दिवशी आहे?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात ४ जुलै रोजी सामना रंगेल. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. भारत, पाकिस्तानसोबत दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघांचादेखील गटात समावेश आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना कधी सुरू होईल?

भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारताचे स्पर्धेतील पुढील सामनेदेखील ३ वाजताच होणार आहेत.

हा सामना कुठे खेळला जाणार आहे?

बर्मिंगहम येथील एजबस्टनमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांसमोर उभे ठाकतील. यानंतरचे भारताचे दोन सामने केन्निग्टंन ओव्हलवर होणार आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कुठल्या वाहिनीवर बघता येईल?

स्टार स्पोर्ट्स १ आणि स्टार स्पोर्ट्स ४ वर सामना पाहता येणार आहे.

सामन्याचे ऑनलाईन स्ट्रिमिंग कुठे बघता येईल?

भारत आणि पाकिस्तान सामन्याचे ऑनलाईन स्ट्रिमिंग हॉटस्टारवर पाहता येईल.

या सामन्याचे वैशिष्ट्य काय असेल?

भारताचा संघ या स्पर्धेत गतविजेता संघ म्हणून उतरणार आहे. विजेतेपद कायम राखण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर पाकिस्तानी गोलंदाज विरुद्ध भारतीय फलंदाज असा वैशिष्ट्यपूर्ण सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, युवराज सिंह यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे. फारशा मोठ्या नावांचा समावेश नसलेला पाकिस्तानी संघ भारतीय संघाचा सामना कसा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारतीय संघात कोणाचा समावेश आहे?

कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, युवराज सिंग, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा

पाकिस्तानच्या संघात कोणाचा समावेश आहे?

कर्णधार सरफराज अहमद, अहमद शेहझाद, अझर अली, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर झमान, हॅरिस सोहेल, हसन अली, इमाद वसिम, जुनैद खान, मोहम्मद आमिर, मोहम्मद हाफीझ, शादाब खान, शोएब मलिक, वाहाब रियाझ

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांचा आतापर्यंतचा इतिहास काय सांगतो?

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला विजयाची संधी दिलेली नसली, तरी चॅम्पियन्स करंडकातील आकडेवारी पाकिस्तानच्या बाजूने आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान तीनवेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये दोनदा पाकिस्तानने विजय मिळवला, तर एकदा भारताने बाजी मारली.