भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याप्रमाणेच, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियातील सामन्यांनाही संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळते. दोन्ही संघांमध्ये रंगणार वाकयुद्ध, चौकार-षटकारांचा पाऊस पाहण्यासाठी सर्व क्रिकेटप्रेमी टिव्हीसमोर ठाण मांडून बसतात. विश्वचषकात भारताविरुद्ध सामना सुरु होण्याआधीच ऑस्ट्रेलियन कर्णधार अरॉन फिंचने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ हे फलंदाज सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्मात आहेत. मात्र बहुतांश चाहत्यांच्या मते विराट कोहली हा जगातला सर्वोत्तम फलंदाज आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणात एक वर्षाची शिक्षा भोगून आल्यानंतर स्मिथचं ऑस्ट्रेलियाच्या संघात पुनरागमन झालं आहे. त्यामुळे स्मिथच्या संघात असण्याचा ऑस्ट्रेलियाला किती फायदा होईलं असं विचारलं असताना फिंच म्हणाला, जेव्हा जागतिक दर्जाचे फलंदाज तुमच्या संघात परत येतात तेव्हा तुमच्यासाठी ती एक नक्कीच चांगली गोष्ट असते. माझ्या मते स्टिव्ह स्मिथ हा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सध्याचा सर्वोत्तम फलंदाज आहे. विंडीज विरुद्ध सामन्यात खडतर परिस्थितीत त्याने केलेली फलंदाजी हे त्याचं उहादरण असल्याचंही फिंच म्हणाला.

विश्वचषक स्पर्धा सुरु होण्याआधी अरॉन फिंचच्या ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला त्यांच्याच मैदानावर पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यातचं विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा इतिहास हा ऑस्ट्रेलियन संघाच्या बाजूने आहे. मात्र विराट कोहलीचा भारतीय संघ सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात याची झलक सर्वांना पहायला मिळाली आहे. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असणार आहे.