मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) मानाच्या Hall of Fame मध्ये स्थान मिळाले. क्रिकेट जगतातील एक प्रतिष्ठेचा सन्मान म्हणून याकडे पाहिले जाते. हा बहुमान शुक्रवारी सचिनला प्रदान करण्यात आला. सचिनसह दक्षिण अफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज ऍलन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाच्या माजी महिला वेगवान गोलंदाज कॅथरीन यांनाही शुक्रवारी ICC च्या Hall of Fame मध्ये समाविष्ट करण्यात आले. Hall of Fame मध्ये स्थान मिळालेला सचिन सहावा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. या आधी बिशन सिंह बेदी, कपिल देव, सुनील गावस्कर, अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड यांना सहभागी केले होते.

Hall of Fame हा बहुमान मिळाल्यानंतर सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या. “प्रत्येक पुरस्कार हा महत्वाचा असतो. मला एका पुरस्काराची दुसऱ्या पुरस्कारही तुलना करायची नाही. प्रत्येक पुरस्कार आणि कौतुक यांचं माझ्या आयुष्यात एक अत्यंत खास स्थान आहे आणि मला त्याबाबत प्रचंड आदर आहे. २४ वर्ष क्रिकेट खेळून झाल्यानंतर ICC कडून मला त्याची पावती या सन्मानाच्या रूपाने मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे”, अशा शब्दात सचिनने Hall of Fame बाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.

“तुमच्या कार्याची दखल घेतली जाणे हेच खूप महत्वाचे आहे. समजा की तुम्ही अगदी लहान आहात आणि पण तेव्हादेखील तुम्ही केलेल्या एखाद्या चांगल्या कामाची दखल घेतली जात असेल तर ते विशेष आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यात आपले आदर्श बदलत असतात. हा प्रवास करताना तुम्ही चांगलं काम केलंत आणि तुमच्या कामाची दाखल घेतली गेली तर ते अधिक महत्वाचे आहे”, असे सचिन म्हणाला.

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक २०० कसोटी सामने, ४६३ एकदिवसीय सामने, कसोटी क्रिकेटमध्ये १५ हजाराहून अधिक धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८ हजाराहून अधिक धावांबरोबरच इतरही अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.