आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत, न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव करून पाकिस्तान संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. या संघाने २००९ नंतर पुन्हा अंतिम फेरीतील तिकीट निश्चित केले आहे. स्पर्धेतील सलग दोन पराभवानंतर हा संघ अशाप्रकारे जेतेपदाच्या लढतीत आपले स्थान निर्माण करू शकेल, असे कुणालाही वाटले नव्हते. यावरुन आता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने पाकिस्तानला चिमटा काढला आहे.

पाकिस्तानच्या या विजयानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफानने या सामन्यानंतर एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये स्तुती नव्हे तर छुपा टोमणा मारताना चिमटा देखील काढला आहे. त्याने लिहिले, ”शेजाऱ्यांचे विजय येत-जात राहतात पण ग्रेस (चॅम्पियनच्या शैलीत खेळ दाखवणे) ही त्यांच्या आवाक्यातील गोष्ट नाही.”

हेही वाचा -IND vs ENG 2nd Semifinal: उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी जोस बटलरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘ट्रॉफीसोबत उभं राहणं ही आमच्यासाठी…..!’

बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तान संघाने बाजी मारत अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डॅरेल मिशेलच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाला ४ गडी गमावून १५२ धावा करता आल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर पाकिस्तानने सहज विजयाची नोंद केली. संघाने १९.१ षटकात ३ गडी गमावून विजय मिळवला. यामध्ये बाबरने ५२ तर रिझवानने ५७ धावा केल्या.