अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत स्मिथ-वॉर्नरच्या पुनरागमनाकडे लक्ष

लंडन

चेंडू फेरफार प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटला काळीमा फासणारे स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर विश्वचषकाच्या व्यासपीठावर आपली एकदिवसीय कारकीर्द पुन्हा सुरू करणार आहेत. गतविश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक अभियानाला शनिवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीने प्रारंभ होत आहे.

चेंडू फेरफार प्रकरणाची एक वर्षांची बंदी संपल्यावर स्मिथ आणि वॉर्नर इंडियन प्रीमियर लीगद्वारे (आयपीएल)  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतले. वॉर्नरने ‘आयपीएल’मध्ये सातत्यपूर्ण फलंदाजी करताना सर्वाधिक एकूण धावा करणाऱ्या फलंदाजाला मिळणारी ‘ऑरेंज कॅप’ तिसऱ्यांदा मिळवली, तर स्मिथने गेल्या आठवडय़ात इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात शतकी खेळी साकारली. मात्र या सामन्यात इंग्लिश चाहत्यांनी या दोघांच्या नावाने घोषणाबाजी केली होती.

आरोन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये खंबीरपणे उभा असून, विजेतेपदासाठी दावेदार मानला जात आहे. मार्चमध्ये भारताविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने ३-२ असा विजय मिळवला होता.

ऑस्ट्रेलियाकडे वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा मारा

ऑस्ट्रेलियाकडे विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम वेगवान मारा आहे. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क या माऱ्याची धुरा सांभाळत असून, जेसन बेहरेनड्रॉफ, नॅथन कोल्डर-नाइल आणि केन रिचर्ड्सन यांचाही यात समावेश आहे. याशिवाय अ‍ॅडम झम्पा आणि नॅथन लायन यांच्या फिरकीमुळे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीतील वैविध्य दिसून येते.

अफगाणिस्तानकडे धक्का देण्याची क्षमता

सहसदस्य राष्ट्र ते कसोटीचा दर्जा लाभलेले पूर्णसदस्य राष्ट्र हा अफगाणिस्तानचा प्रवास स्वप्नवतच ठरला आहे. विश्वचषकाच्या दोन महिने आधी नेतृत्वाची सूत्रे असगर अफगाणकडून गुलबदिन नैबकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे संघातील अनुभवी खेळाडू दुखावले होते. परंतु आता या संघाने विश्वचषक स्पर्धेकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.

सामना क्र. 4

ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान

’स्थळ : काऊंटी ग्राऊंड, ब्रिस्टॉल   ’सामन्याची वेळ : सायं. ६ वा.

’थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १, स्टार प्रवाह मराठी.

संघ

ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरेंड्रॉफ, अ‍ॅलेक्स केरी (उपकर्णधार व यष्टीरक्षक), नॅथन कोल्टर नाइल, पॅट कमिन्स उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्ड्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

अफगाणिस्तान : गुलाबदीन नैब (कर्णधार), मोहम्मद शहझाद (यष्टीरक्षक), नूर अली झादरान, हझरतुल्ला झाझाई, रहमत शाह, असगर अफगाण, हशमतुल्ला शाहिदी, नजीबुल्ला झादरान, समीउल्ला शिनवारी, मोहम्मद नबी, रशीद खान, दौलत झादरान, आफताब आलम, हमीद हसन, मुजीब उर रहमान.

आमनेसामने

एकदिवसीय    

सामने : २, ऑस्ट्रेलिया : २, अफगाणिस्तान : ०, टाय / रद्द : ०

विश्वचषकात   

सामने : १, ऑस्ट्रेलिया : १, अफगाणिस्तान : ०, टाय / रद्द : ०

डेव्हिड वॉर्नर पूर्णपणे तंदुरुस्त असल्यास शनिवारी नक्की सलामीला उतरेल. परंतु तंदुरुस्तीची समस्या असल्यास त्याला खेळवण्याची जोखीम आम्ही पत्करणार नाही.

– जस्टिन लँगर, ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक