टीम इंडियाने नवीन वर्षात पहिल्याच परदेश दौऱ्यामध्ये, ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला. आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून भारतीय संघाने केलेली ही सुरुवात आश्वासक मानली जात आहे. ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघासाठी अनेक सकारात्मक गोष्टी समोर आल्या आहेत. भारतीय गोलंदाजांचं फॉर्मात येणं, लोकेश राहुल-मनिष पांडे यांना मिळालेली संधी आणि त्यांनी त्या संधीचं केलेलं सोनं…अशा अनेक गोष्टी नमूद करता येतील.

मनिष पांडेने या मालिकेत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना, Finisher ची भूमिका निभावली. चौथ्या टी-२० सामन्यात मनिषने झळकावलेलं नाबाद अर्धशतक हे भारतीय संघाच्या विजयाचं प्रमुख कारण होतं. काही महिन्यांपूर्वी महेंद्रसिंह धोनी ज्या क्रमांकावर फलंदाजी करायचा, त्याच जागेवर आता मनिष पांडे फलंदाजीसाठी येतो आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत मनिषने केलेल्या खेळामुळे प्रभावित होऊन, माजी खेळाडू अजय जाडेजाने त्याची तुलना धोनीशी केली आहे.

“१८ व्या षटकात मनिष पांडे बाद झाला आहे, असं फार क्वचित पहायला मिळेल. जर धोनी मर्सिडीज असेल तर मनिष पांडे त्याचं अल्टो व्हर्जन आहे. या दोघांच्याही खेळाची शैली सारखीच आहे, मात्र मनिषकडे ताकद थोडीशी कमी आहे.” Cricbuzz या संकेतस्थळावरील कार्यक्रमात बोलत असताना जाडेजाने पांडेची स्तुती केली.

भारताचा माजी जलदगती गोलंदाज झहीर खाननेही मनिषचं कौतुक केलं. “मनिष परिस्थिती ओळखून फलंदाजी करतो. आपलं बलस्थान काय आहे आणि आपण कशात कमी आहोत हे त्याला चांगलंच माहिती आहे.” दरम्यान ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.