भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका अ विरूद्ध दुसऱ्या अनधिकृत वन-डे सामन्यात ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. यासह तिलक वर्माच्या नेतृत्त्वाखाली भारत अ संघाने ही वनडे मालिका आपल्या नावे केली आहे. निशांत सिंधू, हर्षित राणा व ऋतुराज गायकवाड हे भारत अ संघाच्या विजयाचे हिरो ठरले. दोन्ही गोलंदाजांनी एकत्रितपणे सात विकेट्स घेतल्या आणि दक्षिण आफ्रिका अ संघाला धूळ चारली. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने अर्धशतक झळकावून नाबाद खेळी करत संघाचा विजय निश्चित केला.
दक्षिण आफ्रिका अ संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय मात्र दक्षिण आफ्रिकेसाठी घातक ठरला. कारण संघ ३० षटकांत अवघ्या १३० धावांवर सर्वबाद झाला. तर प्रत्युत्तरात भारतीय संघाने ऋदुराज गायकवाडच्या खेळीच्या बळावर २७.५ षटकांत सहज सामना जिंकला.
राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु संघ ३०.३ षटकांत १३२ धावांवर गारद झाला. दक्षिण आफ्रिकेचे पाच फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत. एका वेळी मार्कस अॅकरमनच्या नेतृत्त्वाखाली संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर लुआन-ड्रे प्रिटोरियस आणि रिवाल्डो मूनसामी यांनी ३९ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली, परंतु दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर संघाने सातत्याने विकेट गमावले.
दक्षिण आफ्रिका अ संघाकडून लुआन-ड्रे प्रिटोरियसने २१ आणि रिवाल्डो मूनसामीने ३३ धावा केल्या. डेलानो पॉटगीटरने २३ आणि डायन फॉरेस्टरने २२ धावा केल्या. प्रेनेलन सुब्रायनने १५ धावा केल्या. कर्णधार मार्क्स अकरमनने ७, जॉर्डन हर्मनने ४ आणि सिनेथेम्बा केशिलेने ३ धावा केल्या. भारत अ संघाकडून निशांत सिंधूने १६ धावांत ४ आणि हर्षित राणाने २१ धावांत ३ विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाने २ आणि तिलक वर्माने १ विकेट घेतली.
भारत अ संघाने २७.५ षटकांत १ बाद १३५ धावांचे सहज लक्ष्य गाठले. ऋतुराज गायकवाड ८३ चेंडूत ९ चौकारांसह ६८ धावांची नाबाद खेळी केली आणि तिलक वर्मा २९ धावांवर नाबाद परतला. तर अभिषेक शर्मा ३२ धावांवर बाद झाला. यासह भारताने ही मालिकाही आपल्या नावे केली.
