Emerging Asia Cup IND A vs PAK A Catch Controversy: इमर्जिंग आशिया चषक २०२५ मधील भारत अ आणि पाकिस्तान अ संघातील सामन्यात पंचांनी चकित करणारा निर्णय दिला. भारतीय अ संघ पाकिस्तान शाहीन्ससमोर १३६ धावा करत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात पाकिस्तानने उत्कृष्ट सुरूवात करत सामन्यात आपला दबदबा कायम राखला. यादरम्यान सुयश शर्माच्या १०व्या षटकात सदाकतला रिले कॅच पकडत नेहाल व नमनने झेलबाद केलं. पण पंचांनी मात्र नाबाद दिलं आणि यावरून गदारोळ सुरू झाला.

पाकिस्तान शाहीन्स संघाचा अष्टपैलू खेळाडू व सलामीवीर माज सदाकत याने संघासाठी उत्कृष्ट अर्धशतकी खेळी केली. यासह तो चौकार-षटकारांचा पाऊस पाडत भारताच्या गोलंदाजीविरूद्ध सहज फटकेबाजी करत होता. यादरम्यान सदाकतचा एक झेल वैभव सूर्यवंशीने सोडला आणि त्यामुळे मैदानावर कायम राहिला. यानंतर तिसऱ्या पंचांच्या निर्णयामुळे तो पुन्हा एकदा वाचला.

भारत-पाक सामन्यात पंचांनी भारताची केली फसवणूक

सुयश शर्माच्या १०व्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळला. सीमारेषेच्या दिशेने जाणारा चेंडू नेहालने धावत जाऊन टिपला आणि त्याचा तोल जाणार हे त्याला कळताच त्याने सीमारेषेच्या जवळ पाऊल टाकत सीमारेषेबाहेर जाण्याआधी त्याने चेंडू मैदानाच्या आत फेकला. जिथे नमन धीरने हा चेंडू पकडला आणि रिले कॅचसह सदाकत झेलबाद झाला. झेल टिपताना किंवा सीमारेषेबाहेर जाताना नेहालचा पाय कुठेही बाऊंड्री लाईनला लागला नव्हता. तरीही तिसऱ्या पंचांनी सदाकतला नाबाद दिलं.

तिसऱ्या पंचांनी सदाकतला नाबाद दिल्यानंतर मैदानावरील पंचांसमोर सर्व भारतीय अ संघाचे खेळाडू गोळा झाले आणि पंचांनी प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. इतकंच नव्हे तर झेल टिपताना नेमकं काय झालं हेही सांगितलं. कर्णधार जितेश शर्मा पंचांच्या निर्णयावर चांगलाच संतापलेला दिसला. मैदानाबाहेरून भारताच्या सपोर्ट स्टाफनेही चौथ्या पंचांशी संवाद साधला. पण पंचांनी त्यांचा निर्णय बदलला नाही आणि सर्वात चकित करणारी गोष्ट म्हणजे त्या चेंडूवर सदाकतलाही षटकार दिला नाही आणि तो चेंडू डॉट बॉल दिला. तर सदाकत व यासिरने झेल पाहण्याच्या नादात धावही घेतली नाही. त्यामुळे त्यांना एकही धाव मिळाली नाही.

भारत अ पाकिस्तान अ सामन्यातील तिसऱ्या पंचांच्या या निर्णयावर चाहते आक्षेप घेत आहेत. इमर्जिंग आशिया चषकातील पंचांच्या कामगिरीवरही चाहते प्रश्नचिन्ह उभारत आहेत.