आशिया चषक रायझिंग स्टार २०२५ मधील सामना भारत अ आणि पाकिस्तान अ संघांमध्ये खेळवला जात आहे. हा सामना दोहामध्ये खेळवला जात असून भारत आणि पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी हँडशेकवरून वाद पाहायला मिळाला. भारत अ संघाचा कर्णधार जितेश शर्मा व पाकिस्तान शाहीन्स संघाचा कर्णधार इरफान खान नाणेफेकीसाठी हजर होते. यादरम्यान नेमकं काय घडलं, जाणून घ्या.

भारत अ संघाचा कर्णधार जितेश शर्मा नाणं उडवलं पण नाणेफेकीचा निर्णय पाकिस्तान अ संघाच्या बाजूने लागला. पाकिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारत अ संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं.

सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी उभे होते. पण राष्ट्रगीत झाल्यानंतर भारतीय संघाने हात मिळवण्यास नकार दिला. आशिया चषक २०२५ मधील भारताच्या वरिष्ठ संघाप्रमाणे भारताच्या अ संघानेही पाकिस्तानला आपली जागा दाखवून दिली.

सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया चषकादरम्यान, भारतीय वरिष्ठ संघाने दोन्ही संघांमध्ये झालेल्या तिन्ही लढतींमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही, ज्यामध्ये अंतिम सामन्याचाही समावेश होता. नाणेफेकीच्या वेळी किंवा सामन्यानंतर कोणीही हस्तांदोलन केलं नाही आणि आता रायझिंग स्टार्स स्पर्धेतही भारताचा अ संघ सिनियर संघाच्या पावलावर पाऊल ठेवत चालत आहे.

आशिया चषक स्पर्धा सुरुवातीपासूनच चर्चेत होती आणि अखेरच्या भारत-पाकिस्तान फायनलपर्यंत दोन्ही संघांमधील वादावादी कायम होती. इतकंच काय तर पाकिस्तान क्रिकेट संघाचे अध्यक्ष व एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील निषेध म्हणून भारताने हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता.