IND vs AUS, World Cup 2023: विश्वचषक २०२३चा पाचवा सामना आज खेळला जात आहे. हा सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा निर्णय त्यांच्याच अंगाशी आला आहे. भारतीय फिरकीच्या तिकडीपुढे कांगारू ढेपाळले. दुसरीकडे, आर. अश्विन (रविचंद्रन अश्विन) याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. अश्विन २०१५ नंतरचा पहिला विश्वचषक सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अश्विनने २०२१च्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत सामनावीर कामगिरीसह आंतरराष्ट्रीय आणि IPL खेळांद्वारे स्वतःला या खेळातील महान खेळाडूंपैकी एक म्हणून स्थापित केले. जिथे त्याने शतक झळकावले आणि ८ विकेट्स घेतल्या. आजच्या सामन्यातील आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने उत्तम गोलंदाजी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या धावांवर रोख लावली आणि एक विकेटही घेतली. त्याने धोकादायक असलेल्या कॅमरून ग्रीनला हार्दिक पांड्याकरवी झेलबाद केले.

सध्याच्या भारतीय संघातील अश्विन हा एकमेव खेळाडू आहे ज्याला एम.ए. चिदंबरम स्टेडियमबद्दल सर्व काही माहित आहे कारण, त्याचे होम ग्राउंड आहे. वाऱ्याच्या दिशेपासून आणि वेगापासून ते खेळपट्टीवरून वळण, पकड आणि उसळी घेण्यापर्यंत, त्याला येथे खेळण्याचा सर्वाधिक अनुभव आहे. आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आपल्या संघाला विजयी सलामी देण्यात अश्विनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

सध्या ऑस्ट्रेलियन संघ धावांसाठी संघर्ष करत असून त्यांच्या आठ विकेट्स पडल्या आहेत. भारतीय संघाने जरी सामन्यावर पकड मिळवली असली तरी चेपॉकची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजीला पोषक आहे. त्यामुळे जर भारताने ऑस्ट्रेलियाला २००च्या खाली बाद केले तर टीम इंडियासाठी ही फार मोठी आशादायक बाब असेल.

हेही वाचा: IND vs AUS, World Cup: रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरताच केला नवा विक्रम, कर्णधार म्हणून मोहम्मद अझरूद्दीनला टाकले मागे

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विश्वचषक सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, अ‍ॅडम झाम्पा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus ashwin returns to the world cup after 8 years gets a chance in the match against australia avw