ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्यांच्यात मैदानात मात देत भारताने दुसरा टी२० सामना जिंकला आणि मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. कर्णधार मॅथ्यू वेडच्या तुफानी ५८ धावा आणि त्याला स्टीव्ह स्मिथने (४६) दिलेली साथ यांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने १९४ धावांची धावसंख्या उभारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवनचं अर्धशतक (५२) आणि हार्दिक पांड्याच्या धडाकेबाज नाबाद ४२ धावांच्या जोरावर भारतीय संघाने सामना ६ गडी राखून जिंकला.

भारतीय संघ वन डे मालिकेत २-१ ने पराभूत झाला होता. पहिल्या दोन्ही सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांना प्रचंड चोप मिळाला. पण तिसऱ्या वन डे सामन्यापासून भारताची गाडी रूळावर आली. टी-२० मालिकेतील पहिले दोनही सामने भारताने जिंकले आणि मालिकाही खिशात घातली. सर्व स्तरातून विराटसेनेवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का हिने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून टीम इंडियाचं अभिनंदन केलं. मालिका विजय आणि अप्रतिम सांघिक प्रयत्नासाठी टीम इंडियाचं अभिनंदन! असं अनुष्काने लिहिलं. त्याच फोटोच्या खालच्या बाजूला विराटबद्दल अनुष्काने प्रेम व्यक्त खास शब्द वापरला. विराटला ‘माय लव्ह’ असं म्हणते तिने त्याचं अभिनंदन केलं.

टीम इंडियाने मोडला पाकिस्तानचा विक्रम

भारतीय संघाचा हा सलग दहावा टी२० विजय ठरला. याआधी भारत आणि पाकिस्तान दोघांनी सलग ९ सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. पाकिस्तानच्या संघाने २०१८-१९ दरम्यान लागोपाठ ९ सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. आता २०१९-२० मध्ये भारताने हा विक्रम मोडला. अफगाणिस्तान संघाने २०१८-१९ मध्ये लागोपाठ १२ सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. भारतीय संघाने जर आणखी तीन सामने जिंकले तर सर्वाधिक सामने सलग जिंकण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर होईल.