IND vs AUS 5th ODI : भारताविरुद्धच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३५ धावांनी विजय मिळवला. २७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव २३७ धावांवर आटोपला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ अशी जिंकली. भारताने या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली होती. पण पुढील ३ सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने भारतावर ३-२ असा मालिका विजय मिळवला. त्यामुळे विराटसेनेची नाचक्की झाली. तब्बल २८ महिन्यानंतर भारताने मायदेशात मालिका गमावली. ऑक्टोबर २०१६ पासून भारत मायदेशात सहा एकदिवसीय मालिका खेळला. त्या मालिका जिंकल्या होत्या. पण आजची मालिका गमावल्याने भारताचा अश्वमेध ऑस्ट्रेलियाने रोखला.

मालिका २-२ अशी बरोबरीत होती. पाचव्या सामन्यात उस्मान ख्वाजाचे शतक (१००) आणि पीटर हॅंड्सकॉम्बचे अर्धशतक (५२) यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतापुढे २७३ धावांचे आव्हान ठेवले. २७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गेल्या सामन्यात १४३ धावांची झंझावाती खेळी करणारा शिखर धवन १२ धावांवर बाद झाला आणि भारताला लवकर पहिला धक्का बसला. त्याने १५ चेंडूत २ चौकार लगावले. चांगली सुरुवात मिळालेला कर्णधार विराट कोहलीही लवकर बाद झाला आणि भारताला दुसरा धक्का बसला. त्याने २२ चेंडूत २ चौकारांसह २० धावा केल्या. ऋषभ पंतही स्वस्तात झेलबाद झाला. १६ चेंडूत १६ धावा करून तो बाद झाला आणि भारताला तिसरा धक्का बसला. एकीकडे गडी बाद होताना रोहित शर्माचे मात्र संयमी खेळी करत अर्धशतक पूर्ण केले. या खेळीच्या जोरावर त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील ८ हजार धावांचा टप्पा गाठला. अष्टपैलू खेळाडू विजय शंकर २१ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला आणि भारताला चौथा धक्का बसला. त्या धक्क्यातून भारत सावरत असतानाच एकाच षटकात रोहित आणि जाडेजा बाद झाले. रोहितने ४ चौकारांसह ८९ चेंडूत ५६ धावा केल्या. तर जाडेजा शून्यावर माघारी परतला. केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ९१ धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर भुवनेश्वर (४६) तर केदार (४४) धावांवर बाद झाला. त्यानंतर शमीदेखील १ धाव करून बाद झाला. अखेर कुलदीप यादवचा त्रिफळा उडवत ऑस्ट्रेलियाने सामना खिशात घातला.

त्याआधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ४३ चेंडूत २७ धावा करणाऱ्या कर्णधार फिंचला लवकर माघारी परतावे लागले. रवींद्र जाडेजाने त्याला त्रिफळाचित केले. त्याने खेळीत ४ चौकार लगावले. ख्वाजाने शतक ठोकले. पण १० चौकार आणि २ षटकार फटकावून आपले मालिकेतील दुसरे शतक झळकावणारा उस्मान ख्वाजा लगेचच बाद झाला. त्याने १०० धावा केल्या. मालिकेत त्याच्या सर्वात जास्त म्हणजेच एकूण ३८३ धावा आहेत. ख्वाजापाठोपाठ स्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध असलेला ग्लेन मॅक्सवेल आजच्या सामन्यात लवकर बाद झाला. त्याने केवळ १ धाव काढली. त्यानंतर जाडेजाने त्याला झेलबाद केले. गेल्या सामन्यात शतक झळकावलेल्या पीटर हॅंड्सकॉम्बने लय कायम ठेवत संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ चेंडूत ५० धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार खेचले.अर्धशतक ठोकल्यावर लगेच तो बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला. त्याने ६० चेंडूत ५२ धावा केल्या. गेल्या सामन्यात धमाकेदार ८४ धावांची नाबाद खेळी करणारा धोकादायक ऍस्टन टर्नर झेलबाद झाला. या बरोबरच ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत परतला. त्याने २० धावा केल्या. स्टॉयनिस (२०), कॅरी (३), कमिन्स (१५) हे फलंदाजदेखील झटपट बाद झाले. पण तळाच्या फळातील झाय रिचर्डसन याने २१ चेंडूत २९ धावा करून ऑस्ट्रेलियाला २७२ धावांपर्यंत मजल मारून दिली.