भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात अखेरीस भारताची फलंदाजी आपल्या जुन्या फॉर्मात परतली. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना लोकेश राहुल – शिखर धवन जोडीने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर ऋषभ पंतही स्वस्तात माघारी परतला. यानंतर धोनी आणि कोहली जोडीने डावाची सुत्र आपल्या हातात घेतली. दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. या खेळीदरम्यान दोन्ही फलंदाजांनी टी-20 क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम आपल्या नावे जमा केला.

दोन्ही फलंदाजांनी टी-20 क्रिकेटमध्ये षटकारांचं अर्धशतक पूर्ण केलं. दुसरा टी-20 सामना सुरु होण्याआधी धोनीचे टी-20 क्रिकेटमध्ये 49 तर विराट कोहलीच्या नावावर 48 षटकार जमा होते. आजच्या सामन्यात दोन्ही फलंदाजांनी षटकारांची आतिषबाजी करत आपलं षटकारांचं अर्धशतक पूर्ण केलं. विराटने यादरम्यान आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. दुसऱ्या सामन्यानंतर धोनीच्या नावावर 52 तर कोहलीच्या नावावर 54 षटकार जमा आहेत.

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज –

रोहित शर्मा – 102
युवराज सिंह – 74
सुरेश रैना – 58
विराट कोहली – 54
महेंद्रसिंह धोनी – 52