भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान तीन सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. भारताने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियमवरती मालिकेतील निर्णायक सामना झाला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम खेळ करून बलाढ्य इंग्लंडला २५९ धावांवर रोखले. भारतीय गोलंदाजी सुरू असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऋषभ पंत युझवेंद्र चहलला मार्गदर्शन करताना दिसत आहे.

भारताच्या वतीने हार्दिक पंड्याने सात षटकांत २४ धावा देऊन चार बळी घेतले. या शिवाय युझवेंद्र चहलने तीन, मोहम्मद सिराजने दोन तर रवींद्र जडेजाने एक बळी घेतला. इंग्लंडच्या डावादरम्यान यष्टीरक्षक ऋषभ पंतने चहलला गोलंदाजी करण्यासाठी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे चहलने त्याचा सल्ला ऐकल्यानंतर त्याला बळीदेखील मिळाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

इंग्लंडकडून फलंदाजीसाठी आलेल्या रीस टॉपलीला फिरकी गोलंदाजीची कल्पना नव्हती. अशा स्थितीत पंतने चहलला थेट स्टंपवर चेंडू टाकण्याचा सल्ला दिला. चहलने तो मान्य करत कृती केली. त्याचा हा चेंडू टॉपलीला अजिबात समजला नाही आणि तो शून्यावर बाद झाला. स्टंप माईकमध्ये ऋषभ पंतचा आवाज कैद झाला आहे.

हेही वाचा – IND vs ENG 3rd ODI : ‘बस करो बस…’, ‘झूम करो झूम..!’ पंत आणि जडेजाची कॅमेरामनसोबत मस्ती

ऋषभ पंतचा हा सल्ला देतानाचा व्हिडीओ बघून अनेक क्रिकेट चाहत्यांना माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीची आठवण आली. भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेला धोनीही अशाच पद्धतीने गोलंदाजांना सल्ला देत असे.