भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळवण्यात आलेली तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने २-१ अशा फरकाने जिंकली आहे. मँचेस्टरयेथील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या निर्णायक सामन्यात भारताने यजमान इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. यष्टीरक्षक ऋषभ पंतचे धमाकेदार शतक आणि हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी, हे या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. सामना संपल्यानंतर ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाने कॅमेरामनची शाळा घेण्याचा प्रयत्न करून त्याला गोंधळात टाकले.

ऋषभ पंतने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासाठी शानदार कामगिरी केली. त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून भारताला विजय मिळवून दिला. पंतने ११३ चेंडूत नाबाद १२५ धावांची खेळी केली. ज्यामध्ये १६ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. हार्दिक पंड्यानेही ५५ चेंडूत ७१ धावा करून पंतला साथ दिली. मात्र, हार्दिक पंड्या शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकू शकला नाही. तो बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजा मैदानावरती आला. त्याने आणि ऋषभ पंतने भारतीय डावाचा शेवट केला.

हेही वाचा – IND vs ENG 3rd ODI : जाफरजी तुस्सी ग्रेट हो! बाजेवर झोपून उडवली ‘बेझबॉल’ची खिल्ली

भारताचा खेळ संपल्यानंतर पंत आणि जडेजा इतर खेळाडूंकडून अभिनंदन स्वीकारत पॅव्हेलियनकडे निघाले होते. त्याचवेळी कॅमेरामन ‘शतकवीर’ ऋषभ पंतचे जवळून फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता. हे बघून ऋषभ पंतने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. “बस करो बस”, असे तो कॅमेरामनला म्हणाला. तिथे उपस्थित असलेल्या रविंद्र जडेजाला मात्र, चेष्टा करण्याची हुक्की आली. त्याने कॅमेरामनला “झूम करो झूम”, असे म्हणत गोंधळात टाकले.