कसोटी मालिकेमध्ये भारताचा दणदणीत विजय पाहून इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेमध्ये भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या टीम इंडियाकडून अपेक्षा वाढल्या होत्या. पण पहिल्या टी-२० सामन्यात क्रिकेट रसिकांचा भ्रमनिरासच झाल्याचं पाहायला मिळालं. सामन्यानंतर आता सर्वच जण आपापल्या परीने या पराभवाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनं मॅच संपल्यानंतरच्या कार्यक्रमातच भारताच्या विजयाचं एक महत्त्वाचं कारण त्याच्या शब्दांत सांगितलं आहे. त्याच्या दृष्टीने विराट कोहलीची विकेट हा भारताच्या पराभवामध्ये आणि इंग्लंडच्या विजयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हिस्सा ठरला. या सामन्यामध्ये विराट कोहली इंग्लंडविरुद्ध सलग दुसऱ्यांदा आणि गेल्या महिन्याभरात तिसऱ्यांदा भोपळाही न फोडता बाद झाला आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये इंग्लंडनं भारताला तब्बल ८ विकेट्स राखून पराभूत केलं. भारतानं ठेवलेलं १२५ धावांचं आव्हान इंग्लंडनं २ विकेट्सच्या मोबदल्यात अगदी लीलया पार केलं. श्रेयस अय्यर (६७ धावा) वगळता टीम इंडियाची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. खुद्द कर्णधार विराट कोहलीचं शून्यावर बाद होणं क्रिकेट रसिकांच्या चांगलंच जिव्हारी लागलं. आदिल रशिदच्या गोलंदाजीवर ख्रिस जॉर्डननं विराट कोहलीचा झेल टिपला.

Video: के. एल. राहुलचे क्षेत्ररक्षण पाहून सर्वचजण झाले अवाक; तुम्ही पाहिलात का हा व्हिडीओ?

भारताच्या पराभवाविषयी बोलताना जोफ्रा आर्चर म्हणाला, “भारताचा कर्णधार विराट कोहलीचं अपयश भारतीय संघाचा आत्मविश्वास खच्ची करणारं ठरलं असावं. आणि त्याचाच सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी इंग्लंडच्या संघाला फायदा झाला. कोहली हा नि:संशय धोकादायक फलंदाज आहे. त्यामुळे इतक्या वेळा त्याला इतक्या लवकर मैदानावरून पुन्हा माघारी जाताना बघणं हा आमच्यासाठी बोनसच आहे. त्याचाच भारतीय संघाला फटका बसला असेल.” जोफ्रा आर्चरनं आपल्या ४ ओव्हरच्या स्पेलमध्ये १ मेडन ओव्हर टाकतानाच फक्त २३ धावा देऊन भारताच्या ३ विकेट्स घेतल्या.

Ind vs Eng T20 : पहिल्याच सामन्यात भारताचा दारुण पराभव; ८ विकेट्स राखून इंग्लंड विजयी!