भारतीय कर्णधार विराट कोहली प्रत्येक सामन्यात नवनवे विक्रम आपल्या नावे करत आहे. उद्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात विराट कोहलीला राहुल द्रविडचा विक्रम मोडण्याची नामी संधी आली आहे. इंग्लडमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूचा मान विराट कोहली आपल्या नावावर करू शकतो.

अखेरच्या कसोटी सामन्यात बरेच विक्रम मोडण्याची शक्यता आहे. भारताचा माजी महान फलंदाज राहुल द्रविडचा एक विक्रम मोडण्याची संधी भारताचा कर्णधार विराट कोहलीला या सामन्यात असेल. कोहलीने आतापर्यंत कसोटी मालिकेतील चार सामन्यांमध्ये 544 धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्याच्या घडीला द्रविडच्या नावावर आहे. द्रविडने २००२ च्या इंग्लंड दौऱ्यामध्ये चार कसोटी सामन्यात ६०२ धावा केल्या होत्या. विराट कोहली सध्या ५४४ धावांसह इंग्लंडमध्ये भारतीय फलंदाजात दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीला द्रविडचा विक्रम मोडण्यासाठी फख्त ५९ धावांची गरज आहे. विराट कोहलीची फलंदाजी पाहता राहुल द्रविडचा १६ वर्ष जुना विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा – Ind vs Eng : चौथ्या कसोटीतला पराभव आश्विनमुळे – हरभजन सिंह

सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने आठ डावांत फलंदाजी करताना दोन शतकांसह ५४४ धावा केल्या आहेत. शुक्रवारी या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहली किती धावा काढतोय हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. ओव्हलवर आतापर्यंत झालेल्या १२ कसोटी सामन्यात भारताला फक्त एक विजय मिळवता आला आहे. सध्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत भारत ३-१ ने पिछाडीवर आहे.

पाचव्या कसोटी सामन्यात संघात तीन बदल अपेक्षित आहेत. हार्दिक पांड्या ऐवजी हनुमा विहारी, राहुल ऐवजी पृथ्वी शॉ आणि अश्विन ऐवजी जाडेजाला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिसऱ्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर विराटने अखेरीस चौथ्या कसोटीत संघात कोणतेही बदल केले नाहीत. तब्बल ३८ कसोटी सामन्यांनंतर विराटने आपला संघ कायम राखला. चेतेश्वर पुजारा सारख्या कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचीही संघातली जागा पक्की नव्हती. मालिकेदरम्यान फलंदाजांनी केलेल्याकामगिरीवर चांगलीच टीका झाली. मात्र गोलंदाजांची कामगिरीही फारशी चांगली नव्हती. इंग्लंडच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांसाठी भारतीय गोलंदाजांनी कोणत्याही प्रकारची रणनिती आखलेली नव्हती. पहिल्या ४ फलंदाजांना माघारी धाडल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उर्वरित फलंदाजांना गृहीत धरलं, आणि प्रत्येक सामन्यात मधल्या आणि तळातल्या फळीतील फलंदाजांनी भारताला धक्का दिल्याचं खेळाडू म्हणाला. दोन संघांमधला शेवटचा कसोटी सामना शुक्रवारपासून सुरु होणार आहे. त्यामुळे या कसोटीत कोणता संघ बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.