रविवार ४ सप्टेंबरला दुबई येथे झालेल्या आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील ‘सुपर ४’ फेरीच्या सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद नवाज यांच्या उत्कृष्ट खेळींमुळे पाकिस्तानने पाच गडी आणि एक चेंडू राखून भारतावर मात केली.

एका आठवड्याच्या आतच पाकिस्तानने भारताकडून झालेल्या पराभवाची परतफेड केली आणि आशिया कप २०२२ च्या सुपर ४ मध्ये विजयाने सुरुवात केली. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली असलेल्या या संघाच्या रोमांचक विजयानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेवटच्या षटकात पाकिस्तानच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरील तणावयुक्त आनंद आपण या व्हिडीओमधून पाहू शकतो. मात्र, पाकिस्तानचा विजय झाल्यावर या खेळाडूंनी ड्रेसिंग रुममध्येच जोरदार सेलिब्रेशन केले.

शेवटच्या षटकात पाकिस्तानला सात धावांची गरज होती. अर्शदीप सिंगच्या पहिल्या चेंडूवर खुशदिलने एक धाव घेतली, तर दुसऱ्या चेंडूवर आसिफ अलीने चौकार मारून पाकिस्तानला विजयाच्या जवळ आणले. आसिफने ही चौकार मारताच पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममधील खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. षटकातील चौथ्या यॉर्कर चेंडूवर अर्शदीपने आसिफ अलीला बाद केले. यावेळी पाकिस्तानी खेळाडू काहीसे हताश झालेले दिसले

मात्र जेव्हा इफ्तिखार अहमदने ५व्या चेंडूवर दोन धावा घेत संघाला विजय मिळवून दिला तेव्हा पुन्हा एकदा पाकिस्तानी खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये आनंदाने उड्या मारल्या.

आशिया चषकात भारताविरुद्ध आठ वर्षांनंतर पाकिस्तानला हा विजय मिळाला आहे. २०१४ साली पाकिस्तानने भारताला एका विकेटने हरवले होते. यानंतर भारताने पाकिस्तानला ५ वेळा पराभूत केले आहे.