IND vs PAK Pahalgam Terror Attack Victim Slams BCCI: आशिया चषक २०२५ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज लढत आज १४ सप्टेंबरला होत आहे. भारत-पाकिस्तान सामना म्हटल्यावर चाहत्यांचा उत्साह कायमच शिगेला पोहोचलेला असतो. पण यावेळेस मात्र चाहत्यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. पहलगाममधील झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूरनंतर चाहत्यांनी हा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयने भारत वि. पाकिस्तान सामन्यावर बंदी घालावी अशी चाहत्यांची मागणी आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील काही जणांनी भारत-पाकिस्तान सामन्याबाबत वक्तव्य केलं आहे.
एप्रिलमध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारतातील २६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. पाकिस्तानमधीलर रेसिस्टंट फोर्स ज्यांचा पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाशी थेट संबंध आहे. त्यांनी सुरूवातीला या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती, पण नंतर माघार घेतली.
पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबाची भारत-पाकिस्तान सामन्यावर संतप्त प्रतिक्रिया
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. ज्यामध्ये भातताने मिसाईलच्या माध्यामाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. भारताने यानंतर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत अनेकदा भारतावर ड्रोन हल्ले आणि ओपन फायरिंग केलं. १० मे रोजी युद्धबंदी झाल्यानंतर या गोष्टींवर पूर्णविराम लागला.
सावन परमार नावाच्या मुलाने या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात त्याचे वडिल आणि भावला गमावलं. त्याने आशिया चषकात होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याबाबत संताप व्यक्त केला आहे. सावन परमार एएनआयशी बोलताना म्हणाला, “भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे हे कळताच आम्ही अस्वस्थ झालो. पाकिस्तानबरोबर कोणत्याही प्रकारे संबंध नकोच… जर तुम्हाला पाकिस्तानविरूद्ध सामना खेळायचा आहे तर माझा १६ वर्षांचा भाऊ मला परत द्या, ज्याच्यावर बेछूट गोळीबार करून त्याची हत्या केली. ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे वाया गेल्यासारखंच वाटतंय.” असंही तो पुढे म्हणाला.
सावन परमार याची आई किरन परमार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारत म्हणाल्या, “हा सामना नाही खेळवला गेला पाहिजे. माझा पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारायचा आहे की, ऑपरेशन सिंदूर अद्याप पूर्ण झालेलं नाही मग भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना का खेळवला जातोय? मी देशातील सर्वांना सांगते, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपल्या माणसांना गमावलेल्या त्या कुटुंबाना जाऊन भेटा आणि त्यांची अवस्था पाहा. आमच्या जखमा अजून ओल्याच आहेत.”
देशभरात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक सामन्याबाबत बंदी घालण्याची चर्चा होत असताना बीसीसीआयने अद्याप सामना रद्द केल्याची घोषणा केलेली नाही.